मुंबई:  राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना सत्ताधारी बाकावरुन त्यांना पुन्हा एकदा साद घालण्यात आली. यावेळी जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेला संवाद सध्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विधानसभा सभागृहात फार गर्दी होते, अशी समस्या राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे उदाहरण दिले. ते असताना सभागृहात कशी शिस्त असायची, याबाबत जयंत पाटील सांगत होते. तेव्हा जयंत पाटील यांनी स्वत:चा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी ही चूक तात्काळ जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, बघा राहुल नार्वेकरांचं माझ्याकडे किती बारीक लक्ष असते. यावर सभागृहात एकच हशा पिकला.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत समोरच्या बाकावर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केले. 'विधानसभा अध्यक्षांनी तुमच्याकडे लक्ष देऊ काय फायदा, तुम्ही प्रतिसादच देत नाही.' त्यावर जयंत पाटील यांनीही तितक्याच हजरजबाबीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांनी अजित पवारांकडे पाहून म्हटले की,'अजितदादा आमच्या पक्षाचे... आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय'. जयंत पाटील यांच्या या हजरजबाबी उत्तराने सभागृहात पुन्हा हशा पिकला. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली. मारकवाडीतील बॅलेट व्होटिंग आणि ईव्हीएम मशीनच्या कथित घोटाळ्यासंदर्भात बोलताना अजितदादांनी विरोधकांना लक्ष्य केले. आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. तर  लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली