मुंबई : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी कोरोना (Corona) काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले.


जयंत पाटील म्हणाले की,  काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके अभिनेते अक्षय कुमार यांचा गब्बर नावाचा सिनेमा आला होता. त्या चित्रपटात एक सीन आहे की, अशाप्रकारे एक हॉस्पिटल, एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत घोषित करते. 


मुख्य आरोपी आपल्या सभागृहाचे सदस्य ही धक्कादायक बाब


हा झाला चित्रपटातील सीन पण आपल्या महाराष्ट्रातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतींचा लाभ घेत त्या सवलतीची पैसे खाल्ले आहेत. यात धक्कादायक बाब ही आहे की, या प्रकरणातील मुख्य आरोपी हे आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहे. मी त्या व्यक्तीच नाव मुद्दामून घेत नाही, असे म्हणतात त्यांनी भाजप आमदार जयकुमार गोरेंवर नाव न घेता टीका केली.  


जयकुमार गोरेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर  


यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की,  ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या ज्ञानात भर पडली आहे.  आता ही चौकशी पाटील साहेबांना अध्यक्ष करून करावी, असे प्रत्युत्तर त्यांनी जयंत पाटलांना दिले. यावरून विधानसभेत काही काळ गदारोळ झाल्याचे दिसून आले. 


नेमकं प्रकरण काय? 


दीपक आप्पासाहेब देशमुख (मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे हे होते. कोरोना काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.  


आणखी वाचा 


Worli Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात