Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah Arrested) शहापूरमधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. 


मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे. मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.  


अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या मिहीर शाहाच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शाह आणि त्याला मदत करणाऱ्या इतर 12 जणांना अटक केली आहे. मिहीर शाहने अपघातावेळी मद्यपान केलं होतं का, अपघातावेळी नेमकं काय घडलं याबद्दल अधिकची माहिती आता पोलिस घेतील. 


या आधी पोलिसांनी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे. 


मिहीरला पळून जाण्याचा सल्ला


या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. तसेच ही गाडी मुख्य पुरावा असून ती अज्ञात स्थळी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत मिहीर शाहाने अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू' असा सल्ला दिल्याचंही पोलिस तपासातून समोर आलं आहे.


वरळी अपघातावरून राजकारण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या विषयावरून धारेवर धरलं आहे. मिहीर शाहाचे वडील राजेश शाह हे शिवेसना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते आहेत. त्यामुळे सत्ताधारी हे आरोपीला पाठीशी घालत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. 


ही बातमी वाचा: