Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या. तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, शेवटी हा पक्ष पवार साहेबांचाच आहे. त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच आता त्यांना अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी ऑफर दिली आहे.
नेमकं काय म्हणाले संग्राम जगताप?
संग्राम जगताप म्हणाले की, जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असायची. मात्र, प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते थांबले. जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं. अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, असे त्यांनी म्हटले आहे. तर जयंत पाटील हे वेगळ्या पक्षात जातील, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत संग्राम जगताप यांना विचारले असता ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
निलेश लंकेंची प्रतिक्रिया
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याबाबत मला माध्यमांकडून माहिती समजली. प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणाचे नाव समोर येतं याबाबत मला कोणतीही माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे. पक्षात कोणती जबाबदारी मिळो न मिळो. मात्र, पक्षासाठी काम करणं अत्यंत गरजेचे आहे. अडचणीच्या काळात पक्ष वाढीसाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते, पक्षात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा