मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटील यांनी सोडलं आहे.जयंत पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील अशी शक्यता होती.जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. मात्र, संधी मिळाल्यास कोणत्या गोष्टींवर काम करणार असल्याचं देखील सांगितलं.

Continues below advertisement

शशिकांत शिंदे काय म्हणाले? 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील  आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही  एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

लोकांमध्ये अंडरकरंट त्याला प्रज्वलित करणं गरजेचं

शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आता संधी मिळेल की नाही हा जर तरचा प्रश्न आहे. कुणालाही संधी मिळाली तरी आमच्यापुढचं आव्हान असेल की सध्याच्या महायुतीच्या कारभारावर जनतेत नाराजी आहे त्याला सक्षम विरोधी पक्षनेता आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करणं आव्हान असेल. लोकांमध्ये अंडरकरंट आहे त्याला प्रज्वलित करणं आवश्यक आहे. 

सरकारच्या आणि महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार निवडणुकीच्या प्रक्रियेत सध्या लोकांच्या प्रश्नांऐवजी निवडणुका कशा जिंकायच्या याचा नवा पायंडा आलेला आहे. लोकांची क्रांती, लोकांचा उद्रेक आणि विरोध, उठाव होतो तेव्हा इतिहास घडत असतो, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. सरकारच्या आणि महायुतीच्या अपयशाकडे आणि चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवून लोकांना प्रेरित करणं आव्हान असणार आहे. सध्याच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत वगैरे, यासाठी काम करुन लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.  

नव्या लोकांना संधी देणार

बेरोजगारीचा प्रश्न आहे, आश्वासनं आहेत, ७५ हजार नोकऱ्या लगेच देतो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचं आहे. इनकमिंग आऊटगोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडन नेतृत्व उभं करणं हा साहेबांचा गुण आहे. कोण जातंय, लगेच यश मिळालं पाहिजे यापेक्षा, राजकीय सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत त्यांना पुढं आणलं तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. सत्ता बदलते दिसल्यावर बरेच लोक मार्ग बदलात. सध्याच्या प्रकरणांवरुन जनता नाराज आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे. युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.  

दरम्यान,  मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या जनरल बॉडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जयंत पाटील यांच्याकडील कार्यभार शशिकांत  शिंदे यांच्याकडे सोपवला जाणार आहे.