Wardha News : भाजप आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांचा वर्धातील विविध गांधीवादी संस्था संदर्भात अत्यंत गंभीर आरोप केले आहे. वर्ध्यात अनेक गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी केली आहे, तिथे विविध सेमिनार बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन माओवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार केला जात असल्याचा आरोप ही सुमित वानखेडे यांनी केला आहे. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीच्या काळात भारत जोडो अभियानच्या माध्यमातून माओवाद्यांनी त्यांना (महाविकास आघाडीला) मदत केली आणि त्या राजकीय मदतीची परतफेड करण्यासाठीच आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला जात असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला आहे. वर्ध्यात गेल्या काही काळात जे घडले आहे, त्या गोष्टींना थांबवण्यासाठी ही महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आवश्यक असल्याचे सुमित वानखेडे म्हणाले. विधेयक दोन्ही सभागृहमध्ये पारित झाल्यानंतर निश्चितच शहरी मावाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन विरोधात कारवाई केली जाईल, मात्र वर्ध्यातील गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांचे जे वर्चस्व निर्माण होत आहे, त्या संदर्भात खऱ्या गांधीवादींनी सावध होण्याची गरज असल्याचे मतही भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केले आहे. 

2047 पर्यंत भारतात तेच करण्याच्या त्यांचे मनसुबे 

वर्धा जिल्ह्यातील अनेक गांधीवादी, सामाजिक संस्था शहरी माओवाद्यांनी काबीज केल्या असा आरोप सुमित वानखेडे यांनी केला आहे. यावेर ते म्हणाले की,  तसा आमचा अनुभव आहे. गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्त्वज्ञान देत  स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकशाही टिकावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. त्या दोघांच्या विचारांना खरा धोका माओवाद्यांपासून आहे. माओवाद्यांना बंदुकीच्या नळीतून क्रांती करायची असून राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे, चीनमध्ये त्यांनी करून दाखवले.2047 पर्यंत भारतात तेच करण्याच्या त्यांचे मनसुबे आहे. असेही ते म्हणाले. त्यासाठी सशस्त्र लढ्यासह त्यांचे विविध फ्रंटल ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. मावाद्यांचे हे फ्रंटल ऑर्गनायझेशन आता वकील, डॉक्टर, तरुण, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकात कार्यरत झाले आहे. असेही ते म्हणाले. 

Continues below advertisement

वर्धा जिल्ह्यात गांधी आश्रम असून अशा ठिकाणी माओवाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि घुसखोरी केली आहे. वर्धातील अनेक संस्थांमध्ये माओवादी विचारांचे लोक आणि त्यांचे समर्थक सेमिनार घेतात, वर्कशॉप घेतात, ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. हे सर्व समाजापुढे आलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हे सर्व जास्त प्रमाणात झाले. भारत जोडो अभियान राबविले गेले. माओवादी विचारसरणीचे लोक त्या अभियानाशी जोडले गेले. त्या लोकांनी राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना (महाविकास आघाडी ) प्रशिक्षण दिलं, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनने एकत्रित येऊन मोदींचा विरोध करत लोकसभा निवडणूक लढवली, संविधान धोक्यात आहे, असा खोटा नरेटीव उभा केला. त्या भरवश्यावर निवडणुकीत अनेकाना यश मिळालं.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मदतीची परतफेड

ज्यांच्या सहकार्याने यश मिळालं, त्यांच्या विरोधात आता कसं बोलणार? लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या माओवाद्यांच्या विरोधात होणाऱ्या कायद्याचा त्यामुळेच आता विरोध केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मदतीची परतफेड केली जात आहे. जे देशाचे शत्रू आहेत, लोकशाही मूल्यांच्या विरोधात काम करत आहेत, जे देशाच्या लाल किल्ल्यावर शस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना समर्थन कशाला केलं जात आहे?असा सवाल ही आमदार सुमित वानखेडे यांनी केला आहे.  

लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे. दलितांना तुम्ही देशापासून वेगळे आहे, असं सांगून त्यांच्यात असंतोषाची बीजे रोवली जात आहे. त्यासाठी संविधान धोक्यात आहे, असा नरेटिव्ह उभं केलं जात आहे. त्याचप्रमाणे आदिवासी, बेरोजगार, तरुण आणि गरीब शेतकऱ्यांमध्ये अशीच भावना निर्माण केली जात आहे. आणि असं कटकारस्थान करणाऱ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन विरोधात कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी कायदा करणं अपरिहार्य आहे. लक्षात ठेवा आज भाजप सत्तेत आहे, उद्या तुम्ही सत्तेत येणार, जेव्हा तुम्ही सत्तेत येणार तेव्हा ही माओवादी तुम्हालाही नुकसान पोहोचल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले. 

वर्ध्यातील गांधीवादी संस्थांमध्ये जी घुसखोरी झाली आहे, त्यासंदर्भात खऱ्या गांधीवादींनी पुढे येऊन सावध होण्याची गरज आहे, हा धोका फक्त गांधीवादी तत्त्वांनाच नाही, तर देशाच्या ऐक्याला, लोकशाही आणि संविधानाला हा धोका निर्माण झाला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचा वर्धा येथील स्थितीकडे पूर्ण लक्ष आहे. आता कायदा झालाय, आज ना उद्या योग्य कारवाई होईल, असा विश्वास आहे.असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या