Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नेतृत्वाची भाकरी अखेर फिरली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदावरून पायउतार होण्यास होणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवताना पश्चिम महाराष्ट्रामधीलच निष्ठावंत चेहरा प्रदेशाध्यक्षपदावर निवडला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यासमोर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाला भिंगरी लावून फिरण्याचेच आव्हान असणार आहे. शशिकांत शिंदे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांनी आदेश देताच उदयनराजे भोसले, शालिनीताई पाटील यांच्याविरोधातही दंड थोपटले आहेत. 

सातारच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा नेतृत्वाला गरज वाटली तेव्हा तेव्हा शशिकांत शिंदे ढाल म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना या मेहनतीचं फळ अखेर प्रदेशाध्यक्ष पदातून मिळाल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीला उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपटले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना महेश शिंदे यांच्या विरोधात निसटता पराभव स्वीकारावा लागला. तरीही शिंदे यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्येही शशिकांत शिंदे अत्यंत ताकतीने विविध प्रश्नांना हात घालत आहेत. त्यामुळे एक प्रकारे नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून झालेला दिसून येतो. सातारमधील दैनिक पुढारीचे निवासी संपादक हरीश पाटणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, शशिकांत शिंदे हे मास लीडर आहेत. अत्यंत उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांनी चालू अधिवेशनामध्येही अनेक विषय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी समजले जातात. भाजप नव्हे तर एकनाथ शिंदेंकडून सुद्धा त्यांना अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र त्यांनी आपली निष्ठा कायम राखली. गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये तरुणांना संधी द्यावी असा मतप्रवाह होता आणि माथाडी कामगार माध्यमातून शशिकांत शिंदे यांचे महाराष्ट्रभर पारडे जड असल्याने त्यांना पसंती दिली असल्याचं हरीश पाटणे यांनी नमूद केलं. 

बालेकिल्ल्यांमध्येच पक्षाची वाताहत

दरम्यान जयंत पाटील यांच्या मवाळ भूमिकेवरून आणि त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चलबिचलवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातही शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा रंगली होती. इतकेच नव्हे, तर कधी अजित पवारांच्या तर कधी भाजपच्या वाटेवर असल्याची सुद्धा चर्चा रंगली. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दमदार प्रचार करूनही अपेक्षित यश मिळालं नव्हतं. जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या साथीनं अवघा महाराष्ट्र पिंजून काढला होता. मात्र त्या तुलनेत अपेक्षित यश मात्र काही मिळालं नव्हतं. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यांमध्येच पक्षाची वाताहत झाली. त्यामुळे नव्याने पक्षाचे बांधणी करण्याचे आव्हान नुतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार आहे. पदाधिकाऱ्यांमधील नाराजी सुद्धा करावी लागणार आहे. पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता.