Jayant Patil on Jansanman Yatra : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) जनसन्मान यात्रेचा (Jansanman Yatra) शुभारंभ केला आहे. गुरुवारपासून नाशिकच्या दिंडोरीतून (Dindori) ही यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेत गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे. अजित पवारांच्या ताफ्यातील गाड्या, फ्लेक्स गुलाबी रंगाचे पाहायला मिळत आहे. तर यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केल्याने दिसत आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जनसन्मान यात्रेवर टीका केली आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनंतर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत यात्रेचा पहिला दिवसाची यात्रा पार पडणार आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ झाला असून माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी जनसन्मान यात्रेवर निशाणा साधला आहे. 


जयंत पाटलांचा खोचक टोला


जयंत पाटील म्हणाले की, आमची यात्रा ही साधी आहे. आमचा कोणताही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडत आहोत. त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर खोचक टोला टीका केली आहे. आता जयंत पाटलांच्या टीकेवर अजित पवार गट काय पलटवार करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


एकत्रित सगळे निर्णय घेणार 


उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केलाय. यात त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गाठीभेटी करत विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, अशी चर्चा सध्या रंगली आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की,  उद्धव ठाकरे दिल्लीला गेले ही मविआच्या दृष्टीने चांगली बाब आहे. एकसंध होऊन आम्ही निवडणुका लढणार आहोत. एकत्रित सगळे निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी यावेळी दिली आहे. तसेच मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा, असेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


अजित पवारांच्या 'जनसन्मान' यात्रेनंतर आता शरद पवार गटाकडून 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन, विधानसभेसाठी कसली कंबर!