पुणे : राज्यातील विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांच्या या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आसून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एक यात्रा काढली जाणार आहे. आज (9 ऑगस्ट) या यात्रेचा शुभारंभ होईल. 


शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रे कालच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू होत आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडेल. 


पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणार यात्रा


या यात्रेच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता जुन्नरमधील लेण्याद्री येथे पहिली सभा घेण्यात येईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शेवटची सभा भोसरी विधानसभेत संपन्न होईल. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पोहोचणार आहे. या यात्रेच्या शुभारंभासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सकाळी 9 वाजता शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत.


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा


दरम्यान, अजित पवार जनसन्माम यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. यात्रेतील बस, चारचाकी वाहने यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेचे काम पाहणाऱ्या मॅनेजमेंट टीमनेही गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलेले आहेत. या यात्रेच्या मदतीने अजित पवार राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यात रणनीतीत ते किती यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी: अजित पवार जन सन्मान यात्रेतून तडकाफडकी मुंबईत, वर्षा बंगल्यावर मोठ्या घडामोडी


"महाविकास आघाडी सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल", झारखंड सरकारचे नाव घेत अजित पवार यांची खोचक टीका!


मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग