पुणे : हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाच्या सोहळ्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संबोधित केलं. आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहून इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झालंय, असं मला वाटत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागं उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवार यांना मोडण्याचे प्रयत्न केले, ईडीची नोटीस पण पाठवली, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचं जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केलं. भाजप नेत्यांचं नाव न घेता जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला.
दिल्लीश्वरांनी जबरदस्ती केली तेव्हा पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला
जयंत पाटील म्हणाले की, एक काळ असा होता, 2019 च्या सुरुवातीला आमच्यातून एक एक नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी मी भाषणं महाराष्ट्रात करत सांगायचो, अ गेला तर चालेल, ब गेला तर चालेल, क गेला तर चालेल, ड गेला तर चालेल, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद ज्या नेतृत्त्वात आहे. एकदा नाही तर त्यांनी आयुष्यात चारवेळा त्यांनी करुन दाखवलं आहे. तुम्ही पुन्हा सगळे प्रवेश करत आहात, तुम्हा सगळ्यांच स्वागत करत असल्याचं जयंतपाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. 2019 च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवारसाहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचं काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवारांच्या मागं उभी राहिली, असं जयंत पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारीचे संकेत
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळं गेले. पण, तुम्ही स्वगृही येत आहात, यापूर्वीच तुम्ही यायला हवं होतं पण आमच्याकडे गर्दी होती, आता येत आहात याचा आनंद असल्याचं जयंत पाटील म्हणाले. बहुजनांच्या उद्धाराचं राजकारण करण्याची पवारसाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी जपली आहे. कितीही हल्ले झाले तरी बहुजन समाजाच्या विकासाची पताका खांद्यावर घेऊन ते चालत आहेत, त्यामुळं शरद पवारांसोबत लोक येत असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीत ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या दोन महिन्यासाठी लाडक्या झाल्या. निवडणुकीत पाच वाजता शिक्का मारुन आलात की तुम्हाला जी वागणूक दिली जाणार जी या भागात बहिणीला दिली जाते, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी हर्षवर्धन पाटील यांना देण्याचे संकेत दिले.
इतर बातम्या :