इंदापूर: सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. त्या संसदरत्न खासदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुप्रिया सुळे या चारवेळा खासदार झाल्या.  तुम्ही तीनवेळा खासदार होण्यात आमचा प्रत्यक्षपणे थोडाफार सहभाग होता. तर चौथ्यावेळी झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केला. हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार गटात (Sharad Pawar) प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर अशा बड्या नेत्यांची हजेरी होती.


यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात एक गुपित उघड केले. लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते. त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेचा भाग आहे. लोकसभेला बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात 36 चा आकडा असल्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना (Ajit Pawar) कितपत मदत करतील, याबाबत साशंकता होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात समेट घडवून आणला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकीला सुनेत्रा पवार यांना मदत करण्यास तयार झाले होते. मात्र, प्रत्यक्षात पडद्यामागून सुप्रिया सुळे यांना मदत केल्याची कबुली जाहीरपणे हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.


भाषणाच्या सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, जयंत पाटील म्हणायचे का थांबला आहात या इकडे. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष प्रवेश केला. आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही. जी जबाबदारी आमच्यावर टाकायची आहे ती टाका. आत-बाहेर करणाऱ्यांपैकी मी  नाही. मला लोकांनी विचारलं पक्ष का बदलला? पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ. जनतेनं जे मला सांगितलं ते आजपर्यंत मी केलं. देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचण सांगितल्या त्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांनी सांगितले, हे देतो ते देतो..पण त्यांना सांगितले आमची लोकं त्या पलीकडे गेली आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.


साहेब तुम्ही निर्धास्त राहा, मी जबाबदारी स्वीकारतो: हर्षवर्धन पाटील


10 वर्षात इंदापूरमध्ये खूप अन्याय झाला. कोणतेही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे इंदापुरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काल बिग बॉसचा निर्णय झाला आणि बिग बॉस बारामतीचा झाला. साहेब तुम्ही बिग बॉस आहात. साहेब तुम्ही निर्धास्त राहा आम्ही जबाबदारी स्वीकारतो. ताई माझी विनंती आहे की, तुमच्या लोकांनी मला समजून घ्यावे. साहेब कधी आमच्या कुटुंबावर बोलले नाहीत. आम्ही कधी त्यांच्यावर बोललो नाही. आमचं दुखणे वेगळं होतं ते बाजूला गेलं, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले. 


आणखी वाचा


हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा