Japan Prime Minister Fumio Kishida: रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जगभराला बसत आहे. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हे युद्ध थांबावे म्हणून प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज (शनिवारी) क्वाडचे आशियातील दोन महत्त्वाचे देश जपान आणि भारत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो धोरणात्मक विचारमंथन आणि चर्चेसाठी 19 मार्च रोजी दुपारी भारतात येत आहेत.


शिखर परिषदेत होणार सहभागी


जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज पहिल्यांदाच भारत भेटीला येत आहेत. जपानचे पंतप्रधान 19 मार्च रोजी दुपारी भारतात पोहोचतील आणि रविवारी 20 मार्च रोजी सकाळी ते पुन्हा जपानला रवाना होणार आहेत. यादरम्यान ते 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. मिळालेल्या माहितीनुसार, यानिमित्ताने जपानचे पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात रशिया -युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही चर्चा होऊ शकते. किशिदा याआधीही भारत दौऱ्यावर आले आहेत. मात्र त्यावेळी ते जपानचे परराष्ट्र मंत्री होते. किशिदा यांनी गेल्या काही वर्षांत चार वेळा पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. किशिदा जपानचे पंतप्रधान झाल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी भारताच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली होती.


सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची घेणार भेट 


संध्याकाळी पाच वाजता दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही पंतप्रधानांमध्ये बैठक होणार आहे. चर्चेनंतर दोन्ही नेते माध्यमांसमोर येणार आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार देखील होऊ शकतात. भारत आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये तब्बल साडेतीन वर्षांनंतर शिखर बैठक होणार आहे. दरम्यान,  2022 हे वर्ष भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता भारत आणि जपान आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर देत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


International Day of Happiness 2022 : जागतिक आनंदी दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्व जाणून घ्या...
Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण