Jalgaon News : शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदा मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे पार पडत आहेत. दसरा मेळाव्यासाठी जळगावातील (Jalgaon) पाचोर्‍याचे शिंदे गटाचे बंडखोर आमदार किशोर पाटील (Kishor Patil)यांच्यातर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. दुसरीकडे त्यांच्याच भगिनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्वर्गीय आर.ओ. पाटील यांचे जे शिवसैनिक सुदृढ व्हावेत, निरोगी राहावेत अस जे स्वप्न होते, त्यानुसार मात्र योग शिबिराचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. मेळाव्याला जाण्यापेक्षा आपला कार्यकर्ता सुदृढ झाला तर पक्ष आणि देश बळकट होईल अशी वैशाली सूर्यवंशी यांनी भूमिका मांडली आहे. कट्टर शिवसैनिकाला कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी गाड्यांची आवश्यकता नाही, कार्यकर्त्यांच्या मनात आतून भावना असल्या पाहिजेत, असा खोचक टोलाही वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू आमदार किशोर पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला आहे.


किशोर पाटील यांच्यातर्फे 200 बस मुंबईला रवाना
शिंदे गटाच्या मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे पाचोरा तालुक्यातील तब्बल दोनशे बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे या बसेस रवाना होत असताना आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भव्य असे योग शिबिर घेऊन त्या माध्यमातून वैचारिक शक्तिप्रदर्शन केल्याचं पहायला मिळालं.


वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून शिबिराचं आयोजन
दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकले नाहीत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्वर्गीय आर. ओ. पाटील यांच्या वाढदिवसाचे आणि दसऱ्याच्या निमित्त साधून पाचोरा शहरात भव्य अशा योग शिबिराचं आयोजन केल्याचं पाहायला मिळालं. पाच दिवसीय योग शिबिराला मोठ्या संख्येने शिवसैनिकांची आणि नागरिकांची उपस्थिती होती.


निष्ठावंत शिवसैनिक उत्स्फूर्तपणे दसरा मेळाव्यासाठी रवाना : वैशाली सूर्यवंशी
जे निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यांना मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी गाडी-घोड्याची कुठलीही आवश्यकता नाही. असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या  मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या मेळाव्यासाठी नेले जात आहे. तब्बल 400 रुपये रोजंदारीही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकाला दिली जात असल्याची शोकांतिका असून दसरा मेळाव्याला यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, अशी टीका वैशाली सूर्यवंशी यांनीआमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर केली आहे. कितीही गाड्या घोड्या केल्या तरी गर्दी मात्र उद्धव ठाकरे यांच्याच मेळाव्याला होणार, असं म्हणत  शक्तिप्रदर्शन करणारे आमदार किशोर पाटील यांना वैशाली सूर्यवंशी यांनी नाव न घेता जोरदार टोला लगावला. तसेच मी मेळाव्याला जाऊ शकले नाही मात्र माझे वडील कट्टर शिवसैनिक आर.ओ. पाटील यांच्या विचारानुसार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुदृढ करण्यासाठी योग शिबीर घेतल्याचेही वैशाली सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Jalgaon : भाऊ शिंदे गटात तर बहिण शिवसेनेत, बहिणीने भावाकडून शिवसेनेचं कार्यालय घेतलं परत