नागपूरः राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व अशी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातही मतभेद निर्माण झाले. मात्र कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहावेत म्हणून मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एसी बसची सोय करण्यात आली आहे. वेळेवर नाश्ता, लंच, दुपारची हाय टी, रात्रीच्या जेवणाची 'व्यवस्था' विशेष काळजी घेऊन करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना कुठलेही त्रास होऊ नये म्हणून टाईम टेबलही बनवण्यात आले आहे. त्यामुळे काय ती एसी बस, काय तो नाश्ता, काय जबरदस्त जेवण समदं ओक्के मंधी हाय अशी प्रतिक्रिया मुंबईला निघालेल्या कार्यकर्त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांचा स्वतंत्र दसरा मेळावा उद्या बुधवारी मुंबई येथे होणार आहे. या मेळाव्याला विक्रमी गर्दी व्हावी, यासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. दसरा मेळाव्यात शिंदे आणि चाळीस आमदारांचे दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासात शिर्डी आणि शेगाव येथे आशीर्वाद घेण्याची संधी या समर्थकांना मिळणार आहे. त्यामुळेच काही श्रद्धाळू शिवसैनिक शिंदे यांच्या वारीत सामील झाल्याची जोरदार चर्चा आहे.


कवडीचाही भुर्दंड बसू नये याची काळजी


चंद्रपुरातूनसुद्धा (Chandrapur) शेकडो शिंदे समर्थक आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्यासाठी वातानुकूलित बस आणि तीन वेळेचा चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था चंद्रपूर ते मुंबई या प्रवासादरम्यान केली आहे. समर्थकांना एक पैशाचाही भुर्दंड बसू नये, याची विशेष काळजी शिंदे गटाने घेतली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. या मेळाव्याला दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो शिवसेना कार्यकर्ते जातात. 


दोनच पदाधिकारी...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आमचीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. त्यांनीही मुंबईला दसरा मेळावा आयोजित केला. ठाकरे आणि शिंदे गटाचा स्वतंत्र मेळावा मुंबईत होणार आहे. यासाठी दोघांनीही शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे गर्दीचा उच्चांक गाठण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात शिंदे गटाचे दोनच पदाधिकारी आहेत. जिल्हा प्रमुख नितीन मत्ते आणि संपर्क प्रमुख बंडू हजारे यांच्या नेतृत्वात आज दुपारी बारा वातानुकूलित बसेसनी शिंदे समर्थकांनी मुंबईची वाट पकडली. शिंदे गटांनी वातानुकूलित बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.


'त्या' सभेला नव्हता प्रतिसाद


काही दिवसांपूर्वी हिंदू गर्जना यात्रेसाठी अन्न व औषध विभागाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) चंद्रपुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिंदे गटाचे केवळ दोनच पदाधिकारी जिल्ह्यात आहे. त्यामुळे शेकडोंच्या संख्येत या वातानुकूलित बसेसमध्ये बसण्यासाठी अचानक शिंदे समर्थक जिल्ह्यात आले कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुकटात जिवाची मुंबई करण्यासाठी अनेकजण तात्पुरते शिंदे समर्थक झाले, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते गेले. मात्र आम्हाला पक्षातर्फे कोणताही खर्च देण्यात आला नाही. आम्ही स्वखर्चाने जात आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शिंदे समर्थकांना चंद्रपूर ते मुंबई या प्रवासात खिशात हात घालण्याची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 


अनेकांना पर्यटनाची हौस?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आज चंद्रपुरातून बसेसनी संध्याकाळी चिखली पोहोचले. तिथे तृप्ती लॉन येथे सायंकाळचे जेवण, जेवणानंतर रात्रीच दहा वाजता मुंबईला रवाना, 5 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता मुंबईला पोहोचणे. तिथे चहा, नाश्ता आणि आंघोळीची व्यवस्था अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आहे.  दुपारी तीन वाजता बीकेसी (BKC Ground) मैदानाकडे रवाना होणार. सभा आटोपल्यानंतर रात्री बसेसमध्येच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर चिखलीच्या दिशेने रवाना होणार. परतीच्या प्रवासात चिखली येथे जेवण आणि जेवणानंतर चंद्रपूरच्या दिशेने रवाना, अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यात शिंदे आणि चाळीस आमदारांचे दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासात शिर्डी (Shirdi) आणि शेगाव (Shegaon) येथे आशीर्वाद घेण्याची संधी या समर्थकांना मिळणार आहे. त्यामुळेच काही श्रद्धाळू शिवसैनिक शिंदे यांच्या वारीत सामील झाल्याची जोरदार चर्चा आहे. केवळ शिर्डी आणि शेगाव दर्शनासाठी अनेकांना या बसेसमध्ये गर्दी केल्याचंही सांगण्यात येत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे जत्थे मुंबईकडे, दोन्ही गटांकडून व्यवस्था, शिंदे गटाने विदर्भातून केली तयारी


Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोक... आता उपोषण सोडा