Aaditya Thackeray Jalgaon Visit : शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे उद्या (20 ऑगस्ट) जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पहिला दौरा ते शिंदे गटात (Shinde Group) सहभागी बंडखोर आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा या ठिकाणी करणार आहेत. या दौऱ्यावर बंडखोर आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आधीच जर हे दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती," या शब्दात बंडखोर आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसंच "दुसऱ्या यादीत मंत्रिपद मिळालं नाही तरी मी मुख्यमंत्री आहे, असं मला वाटतं," असंही किशोर पाटील म्हणाले.


'...तर आज ही वेळ आली नसती'
"आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात आमदार म्हणून स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असं यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले. मात्र आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत, हेच दौरे जर आधी केले असते तर आज ही वेळ आली नसती. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट बाहेर पडला नसता," असं स्पष्ट मत व्यक्त करत शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.



'मंत्रिपद मिळालं नाही तरी मी मुख्यमंत्री आहे, असं मला वाटतं'
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मंत्रिपदाबाबत मत व्यक्त करताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला मंत्रिपद मिळावं अशी अनेकांची इच्छा आहे. तशी मलाही आशा आहे. दुसऱ्या यादीत नक्की मंत्रिपद मिळेल, असं मला वाटतं आणि नाही मिळालं तरी मी मुख्यमंत्री आहे, असं मला वाटतं, 


विजयाची हॅटट्रिक करेन : किशोर पाटील
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यावर बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की या ठिकाणी कुणी किती शक्तिप्रदर्शन केलं तरी मतं मात्र मिळू शकत नाहीत. त्यामुळे मी डंके की चोट पे तिसऱ्यांदा निवडून येईल आणि विजयाची हॅटट्रिक करेन, असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिला आहे.


शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी
जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे पाचोरा तालुक्यातील सामनेर या गावापासून ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे तर पाचोरा शहरात सुद्धा अनोख्या पद्धतीने शिवसैनिकांची उपस्थिती राहणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितलं. जिल्ह्यात पहिली सभा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा या ठिकाणी होणार आहे.