Congress Rally On Inflation: महागाईविरोधात काँग्रेसने आपल्या प्रस्तावित रॅलीची तारीख पुढे ढकलली आहे. या रॅलीसंदर्भात गुरुवारी दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, भूपेंद्र हुडा, अजय माकन, केसी वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. आता 4 सप्टेंबरला 'महागाईविरोधात हल्लबोल रॅली' काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ही रॅली 28 ऑगस्टला काढणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. 


काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी ट्वीट केले आहे की, "कोविड-19 ची सद्यस्थिती पाहता, काँग्रेस पक्षातर्फे 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या महागाईविरोधात हल्लबोल रॅलीची तारीख पुढे वाढवण्यात येत आहे. आता ही रॅली 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. या रॅलीतून असंवेदनशील मोदी सरकारला कडक संदेश दिला जाणार आहे. 22 ऑगस्टला राज्यस्तरावर, 25 ऑगस्टला जिल्हास्तरावर आणि 27 ऑगस्टला ब्लॉक स्तरावर 'महागाईविरोधात हल्लबोल, दिल्ली चलो' परिषद होणार आहे. दिल्लीत 4 सप्टेंबरला होणाऱ्या या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत.


महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरूच 


काँग्रेसने यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात रॅली काढण्याची घोषणा केली होती. येत्या आठवड्यात महागाई आणि बेरोजगारीविरोधात अनेक आंदोलने करून काँग्रेस हा लढा पुढे नेणार असल्याचे पक्षाने म्हटले होते. 17 ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत पक्ष सर्व विधानसभा मतदारसंघातील बाजारात आणि इतर अनेक ठिकाणी 'महागाई चौपाल' सभा आयोजित करेल. 28 ऑगस्ट 2022 रोजी महागाईविरोधात हल्लबोल या रॅलीमध्ये त्याची सांगता होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता या रॅलीची तारीख बदलून 4 सप्टेंबर करण्यात आली आहे.


दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसने 5 ऑगस्टला काळे कपडे घालून मोदी सरकारच्या धोरणांविरोधात देशव्यापी निदर्शने केली. या निदर्शनात राहुल गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी दिल्लीत आंदोलन केल्याबद्दल ताब्यात घेतले होते. मोदी सरकारच्या कारभारामुळे देशातील जनता त्रस्त असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. देशात महागाई सातत्याने वाढत आहे. काँग्रेस खासदारांनी पावसाळी अधिवेशनात महागाईबाबत फलक घेऊन सभागृहात निदर्शने केली होती, त्यानंतर सभापतींनी काँग्रेसच्या अनेक खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून बाहेर काढले होते.