Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने सुषमा अंधारे  (Sushma Andhare) यांच्या सभा होत आहेत. यादरम्यान धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबद्दल युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आता आज मुक्ताईनगर (Muktainagar) येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या सुषमा अंधारे यांच्या सभेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे, याबाबतचे आदेश प्रशासनाने पारित केले आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.


कालच प्रशासनाने युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना भाषणबंदी तसेच जिल्हा बंदी केली होती. आता पुन्हा सुषमा अंधारे यांच्या सभेला बंदी घातली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमालाही नाकारली परवानगी
दरम्यान आजच शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटल यांच्यातर्फे मुक्ताईनगरात महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सुषमा अंधारे यांची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते समोरासमोर येऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अंधारे यांची सभा तर दुसरीकडे शिंदे गटाच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला सुद्धा परवानगी नाकारली आहे.


कार्यक्रम होणारच, ठाकरे आणि शिंदे गट ठाम
जिल्हा प्रशासनाने सभा आणि महाआरतीच्या कार्यक्रमावर बंदी नाकारली असली तरी सुषमा अंधारे यांची नियोजित सभा होणारच असे उद्धव ठाकरे गटातर्फे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे महाआरतीचा कार्यक्रम सुद्धा होईलच, शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगरातील सायंकाळी सभा आणि महाआरती या दोघा कार्यक्रमांकडे जिल्ह्याकडे लक्ष लागले आहे.


महाआरती आणि सभा अशा दोन्ही कार्यक्रमांचे स्टेज पोलिसांनी काढून घेतले
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या सभेला तसेच शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही महाआरतीच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने जिल्ह्याचा राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाप्रबोधन यात्रेची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमांसाठी लावण्यात आलेले स्टेज सुद्धा आता पोलिसांकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता हे दोन्ही कार्यक्रम होऊ नये असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला. कायदा व सुव्यवस्थेची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून दोन्ही कार्यक्रम होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे तर दुसरीकडे मात्र शिंदे गट व उद्धव ठाकरे गट दोघेही कार्यक्रम होईलच असे सांगत असल्याने नेमकं दोन्ही कार्यक्रम रद्द होतात की दोघेही कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच होतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.


VIDEO : Sushma Andhare Sabha : मुक्ताईनगरमध्ये होणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी



इतर महत्त्वाची बातमी