MNS On Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' 6 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान मनसेकडून (MNS) सुद्धा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करण्यात आली आहे.'देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत' अशा शब्दात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 


यवतमाळ येथे माध्यमांशी बोलतांना महाजन म्हणाले की, भरात जोड यात्रा असं काँग्रेसने नावं कसं दिलं मला माहित नाही. कारण काँग्रेसच्या राजकीय धोरणामुळे भारताची फाळणी झाली हे कटू सत्य आहे. पण आज तीच काँग्रेस भारत जोडो यात्रा करते, तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय आहे. पुन्हा बांगलादेश आपल्यात मिसळायचं आहे का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु असून, पक्षाचे नेते आता चालण्याचा सराव करतायत. कारण हे नेते कधी चाललेच नाही असा टोलाही महाजन यांनी लगावला.


यांना फक्त वाचवण्याची चिंता...


पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येणार असल्याने काँग्रेसचे हेवी वेट नेते आता सकाळी उठून व्यायाम करतायत. नाना पटोले सारखे नेते चालण्याचा सराव करतायत. तिकडे अशोक चव्हाण चालतायत आणि नाना पटोले इकडे योगासने करतायत. यांना फक्त स्वतःचा पक्ष वाचवण्याचं पडलं असून, जनतेच्या सुखदुःखाशी काहीही देणघेण नाही. सत्तेत असतांना यांनी काहीच केले नाही, अशी टीकाही महाजन यांनी केली.   


अन्यथा उद्धव ठाकरेंची सत्ता गेली नसती...


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करतांना प्रकाश महाजन म्हणाले की, दुसरी आणखी एक 'महा प्रबोधन' यात्रा' आपल्या महाराष्ट्रात सुरु आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धोरणे अमलात आणले असते तर यांची सत्ता गेली नसती आणि यांच्यावर अशी वेळ आली नसती. एकेकाळी ज्यांनी शिवसेनेला शिव्या दिल्या आज तेच स्टेजवरून शिवसेनेच महत्व सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच काम करत असल्याचं महाजन म्हणाले.