Sushma Andhare on Sanjay Shirsat : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत माझी काळजी करण्याची गरज नाही, मी सक्षम आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर पुन्हा सुषमा अंधारे यांनी मत व्यक्त केलं असून त्यांना वेदना होत आहेत, मात्र त्या ते व्यक्त कशा करून दाखवतील, असं उत्तर संजय शिरसाट यांना दिलं आहे.
"आता त्यांची अडचण अशी आहे की, त्यांना बोलता येत नाहीये. गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाची भूमिका मांडणारे पहिले आमदार जर कोण होते, तर ते संजय शिरसाट. पण, संभाजीनगरमध्ये आता अतुल सावे असतील, संदिपाल भूमरे किंवा अब्दुल सत्तार असतील यांना ज्या पद्धतीने अधिकार आणि फुलफ्लेज स्कोप दिला जात आहे, त्यामुळे संजय शिरसाट यांची कुचंबणा होत आहे. पण तरीही बोलताना संजय शिरसाट हसताना दिसून येत आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...", असं म्हणत अंधारे यांनी टोला लगावला आहे.
"मी खरंच देवासाठी प्रार्थना करेल की, योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच दीपक केसरकरांना खरंच गंभीरता कळत नाहीये, पण संजय शिरसाट यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यामुळे ते कधीही शिवसेनेत येवू शकतात.", असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे.
"विष ओकणारे उद्धव ठाकरे गटात येत आहे. मग उद्या उद्धव ठाकरे हे ओवैसींची भेट घेतली का? असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तुषार भोसले यांनी केलं आहे. या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. असली माणसं जी आहेत ना, ती भाजपनं फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी सुपारी बाज पद्धतीनं ठेवली आहेत. अशा माणसांना मी महत्व देत नाही आणि त्यांच्या टीकेला उत्तरही देत नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.
शरद कोळी यांना जिल्हा बंदी केल्यानंतर पोलिसांनी चोपडा येथील सभेला येत असताना तीन ठिकाणी माझी गाडी तपासली. गाडीमध्ये खरंच शरद कोळी बसले आहेत का? याची चौकशी केली, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली आहे. पण आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यानुसार शरद कोळी यांना जिल्ह्याबाहेर सोडेपर्यंत सोबत होतो, असंही त्यांनी सांगितलं.
अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठीचं आंदोलन हे काँग्रेसचे सरकार घालवण्यासाठी भाजपचं षडयंत्र होतं, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अण्णा हजारे यांची लोकपाल विधेयकाची मागणी ही संविधानाच्या चौकटी बाहेरची मागणी होती. आपल्याकडे जी संसदीय लोकशाही पद्धती आहे, ती मोडीत काढून, अध्यक्ष लोकशाही आणण्याचा तो एक प्रयत्न होता. कारण त्या मधल्या त्रुटी या कधीच दाखविण्याचा प्रयत्न झाला नाही. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे विभक्त असले पाहिजे हे मूळ चौकट आहे. लोकपाल विधेयक जेव्हा या तिघांच्यावर बसवतात, तेव्हा तुम्ही संविधानिक चौकट मोडण्याचा प्रयत्न करतात, असं स्पष्टीकरणही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिलं. तसेच लोकपाल आंदोलन ज्या पद्धतीनं अण्णा हजारे यांनी उभ केलं. सरकार उलथवून लावायचं आणि लोकांमध्ये एक लाट निर्माण करायची, यासाठीच होतं. लोकपाल आंदोलन हे सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एक हाती सत्ता देण्यावर भर देणारे म्हणजेच, संविधानाच्या चौकटी बाहेरचं होतं, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :