Jalgaon Loksabha : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे, तर ठाकरे गटाने करण पवार यांना रिंगणात उतरवले आहे. पीएम मोदींचे नेतृत्व पुढे आल्यापासून जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेहमीच भाजपाला साथ दिलीये. जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदारांची संख्या पाहिली तर भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, सहजसोपी वाटणारी निवडणूक नाराज झालेल्या उन्मेश पाटलांनी (Unmesh Patil) बंड करत थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने थोडेशी कठिण झाली आहे. ठाकरे गटात प्रवेश करताना उन्मेश पाटील एकटेच गेले नाहीत, तर त्यांनी त्यांचे सहकारी आणि मित्र असलेल्या करण पवार (Karan Pawar) यांनाही सोबत नेले. त्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) नुकतेच पक्षात आलेल्या करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जळगावात कोणाचे किती आमदार ?
जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे 2, शिंदे गटाचे 3 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. त्यामुळे आमदारांची संख्या पाहिली तर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा एकही आमदार या मतदारसंघात नाही.
ठाकरे गट शेतकरी समस्यांवरुन आक्रमक
दरम्यान, भाजपचे एकहाती वर्चस्व असले तरी ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून जनमत आपल्या बाजूने खेचण्याच्या प्रयत्न केला आहे. दुधाचा भाव, पिकविमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन ठाकरे गटाने रणशिंग फुंकलं आहे. सत्ता असतानाही गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही, असा ठाकरे गटाने केला आहे.
स्मिता वाघ यांच्यामागे भाजपचे संघटन, करण पवारांचा तगडा जनसंपर्क
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यामागे भाजपने संघटन उभे केले आहे. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटना वाघ यांच्यासाठी ताकद लावताना दिसत आहे. शिवाय, महायुतीच्या नेत्यांकडून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, असे असले तरी नुकतेच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेश पाटील आणि करण पवार यांना भाजपच्या रणनितीची संपूर्ण माहिती आहे. भाजप कशापद्धतीने प्लॅनिंग करते, याच्या खाचाखोचा दोन्ही नेत्यांना माहिती आहेत. करण पवार यांचा जनसंपर्क तगडा आहे. शिवाय माजी मंत्री सतीश पाटील यांनी करण पवार यांच्यामागे ताकद उभी केली आहे. तर दुसरीकडे वंचितनेही युवराज जाधव यांना उमेदवारी देत तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंचे करण पवार यांच्यामध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या