Jalgaon News : औषधींसाठी जिल्हा नियोजनमधून निधी खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपस्थित केल्यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. या विषयावरुन सभागृहात मात्र काही वेळासाठी वातावरण चांगलंच तापलं होतं.


शिंदे सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्हा नियोजन समितीचे आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील तसंच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणाऱ्या या तिन्ही नेत्यांच्या बैठकीला असलेल्या उपस्थितीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेलं होतं.


सभागृहात अधिकाऱ्यांनी औषधीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबतचा प्रश्न मांडला. यावर एकनाथ खडसे जिल्हा नियोजन समितीतून औषधींसाठी निधी खर्च करण्याची गरजच काय? वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधींसाठी निधी का वापरले नाहीत? या औषधींचा खर्च का करु नये?   औषधींसाठीचा हा निधी कोरोना काळातील आहेत का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित करत एकनाथ खडसेंनी सभागृहातील अधिकाऱ्यांना तसेच मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं. 


याच मुद्द्यावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात तू तू मैं मैं झाली. तुमच्या घरातून कुठे पैसे जात आहेत, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अखेर गिरीश महाजन यांनी कशा पद्धतीने औषधींसाठी पैसे खर्च करतात याची माहिती दिली. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत या विषयात मार्ग काढण्यात येईल असे सांगितलं. त्यानंतर हा विषय थांबला. मात्र या विषयामुळे सभागृहातलं वातावरण चांगलं तापलं होतं.


हा विषय या सभागृहापुरता जरी थांबला असला तरी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील प्रत्यक्षातील ही खडाजंगी राज्याला आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली. 


जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे एकटे पडले
जळगावचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आला आहे. यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला आघाडीच्या फळीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे  एकनाथ खडसे यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत.