मुंबई: लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेला माढा सध्या चांगलाच चर्चेत आहे. भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, महाविकास आघाडीचा माढ्यातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मविआच्या जागावाटपात माढ्याची जागा शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वाट्याला येणार आहे. परंतु, याठिकाणी आपला उमेदवार उभा न करता शरद पवार यांच्याकूडन राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढ्यातून पुढे केले जाऊ शकते. शरद पवार यांनी मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha) महादेव जानकर यांच्या पाठिंबा देण्याबाबत भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महादेव जानकर आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाल्याची चर्चा होती. त्यामुळे राजकीय वर्तुळाची उत्सुकता वाढली होती. परंतु महादेव जानकर यांनी शुक्रवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची आणि शरद पवार यांची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले.


माझी आज शरद पवारांशी भेट झालेली नाही. माध्यमांना चुकीची माहिती मिळाली आहे. मी त्या ठिकाणी देशोन्नतीचे संपादकांना भेटायला गेलो होतो. मविआच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना शरद पवार साहेबांनी मला माढ्याची जागा देऊ केली आहे. पण मी माढा आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी आग्रही आहे. अद्याप परभणीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. पण रासपला परभणीची जागाही हवी आहे. मविआने अद्याप आम्हाला चर्चेला किंवा बैठकीला बोलावलेले नाही, असे महादेव जानकर यांनी सांगितले. 


माढा मतदारसंघावर शेकापच्या दाव्याने नवा तिढा


शरद पवारांनी मतांचे समीकरण ओळखून माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना पाठिंबा द्यायचे ठरवले असले तरी त्यासाठी विरोधी पक्षांनी एकदिलाने लढणे आवश्यक आहे.परंतु, आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकत्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत, असा जयंत पाटील यांचा आग्रह आहे. त्यामुळे महादेव जानकर यांना पुढे करुन माढा जिंकण्याचे योजना आखणाऱ्या शरद पवार आणि महाविकास आघाडीसमोर पेच उभा राहण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


माढा लोकसभा भाजपचाच, लोकांना संभ्रमित करू नका; रणजित निंबाळकरांचे रामराजे निंबाळकरांना प्रत्युत्तर