Indpaur Vidhansabha: पुणे : विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वांना लागले असून नोव्हेंबर महिन्यात राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असल्याने अनेक मतदारसंघात जागावाटपात मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच, राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचे स्थानिक नेते नाराज असून आपल्या मतदारसंघात भाजपलाच जागा सुटावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला जागा असा फॉर्म्युला निश्चित मानला जात आहे. त्यातच, आता इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपचे इच्छुक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलंय.
दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी एका गावात ग्रामस्थांशी बोलताना चक्क स्वत:ची उमेदवारीच जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी काम केलंय, मनापासून काम केलंय, तुम्हाला सभामंडप दिलं असेल, व्यक्तिगत कामासाठी माझा उपयोग झाला असेल तर मलाच आशीर्वाद द्या, असेही भरणे यांनी म्हटले. तुम्ही मामा आहात आणि तुम्हीच उमेदवार आहात, असे समजा या दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याने इंदापूरमध्ये (Indapur) महायुतीत खळबळ उडाली आहे. एकीकडे महायुतीचे जागावाटप झालं नाही, पण अजित पवारांनी इंदापूरची जागा ही विद्यमान अमादार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असे संकेत दिले होते. त्यावर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता तर थेट दत्तात्रय भरणे यांनी तुम्हीच मामा आहात आणि तुम्हीच उमेदवार आहात असे वक्तव्य केल्याने इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे भरणे यांनी हे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार किंवा तुतारी हाती घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण अजित पवारांच्या वक्तव्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मौन बाळगलं होतं. आता त्यांनीच स्वतःचीच उमेदवारी घोषित केली आहे, त्यामुळे आता इंदापूरमध्ये महायुतीत खळबळ उडाली असून हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात, भाजपकडून त्यांची मनधरणी होते का, त्यांना संधी मिळते का, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातात, हे चित्र पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.