नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे लढायचे ठरवल्यास आम्ही किमान 6 जागांवर जिंकू, असा ठाम दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चेचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे ठेवू. पण युती न झाल्यास आम्ही ज्या जागा लढणार होतो, त्याची यादी आमच्याकडे तयार आहे, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले. ते शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करुन घेत जात नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. आम्ही लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत उपरे आहोत. त्यांची चर्चा झाली की ते आम्हाला बोलवतात. पण आम्ही शेवटपर्यंत चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह धरणार आहोत. मला सध्या जे काही दिसत आहे त्यावरुन महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात घमासान युद्ध सुरु आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या दोघांमधील वाद संपला की वंचितचा उपरेपणा संपेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


लोकसभेच्या 48 जागा लढवण्याची आमची तयारी: प्रकाश आंबेडकर


महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की नाही, हे मला माहिती नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की, आम्ही स्वतंत्रपणे लढलो तरी लोकसभेला किमान सहा जागा जिंकू शकतो. महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलावले नसते आणि आम्ही स्वबळावर लढलो असतो तर आम्ही किमान 6 जागा जिंकलोच असतो. कदाचित उद्या यामध्ये वाढही होऊ शकते. आम्ही पत्र देतानाच 48 उमेदवारांची तयारी केल्याचे सांगितले होते. आम्ही त्यामध्ये मतदारसंघही नमूद केले आहेत. या मतदारसंघांमध्ये आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करुन तयारी केली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


मविआताली पक्षांनी आपली ताकद पाहून जागा मागाव्यात, प्रकाश आंबेडकरांचा टोला


यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला टोला लगावला. फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी. आपली ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्या. उद्या असं होऊ नये की, कोंबडी आम्ही शिजवली. त्यानंतर आम्हाला फक्त कोंबडीचं मुंडकं दिलं आणि उरलेली कोंबडी इतर लोक घेऊन गेले. आम्ही तसं होऊ देणार नाही. मी आमच्या लोकांना सांगितलं आहे, आपण शेवटच्या क्षणापर्यंत थांबू. मिळून मिसळून आणि सन्मानाने कोंबडी खाऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.


आणखी वाचा


महाविकास आघाडीत बैठकीच्या तारखेवरून घोळ; प्रकाश आंबेडकर म्हणाले, तारीखच बदला