पंढरपूर: भाजप पक्ष विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राजकारण केले नसते, असे वक्तव्य विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात काल विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी बदलापूर प्रकरणाबाबत विरोधकांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला.
पंकजा मुंडे यांनी विरोधकांना बदलापूर प्रकरणावरुन खडे बोल सुनावले की, गेल्या दशकभरात महिला अत्याचाराच्या अत्यंत निर्घृण आणि क्रूर घटना घडत आहेत. निर्भयापासून बदलापूरपर्यंत अत्याचार घटनांमध्ये क्रूरता वाढत आहे. यामध्ये दशकभरात वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी भूमिका बजावल्या आहेत. या घटनेत राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळली पाहिजे. आपण विरोधक असतो तर अशा घटनेचे राजकारण केले नसते अशा शब्दात विरोधकांचे कान टोचले. तसेच अशा घटनातील आरोपींना नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांची तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना तब्बल 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. यावरुन गृह मंत्रालय आणि राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक ताशेरे ओढत आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.
रावसाहेब दानवेंनी शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरुन विरोधकांना फटकारले
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मविआचे नेते बुधवारी राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना फटकारले आहे. कंत्राटदाराने काळजी घ्यायला हवी, ती घेण्यात आली नाही. ही दुर्दैवी घटना आहे. आशिष शेलार यांनी माफी मागितली आहे. राज्यात जेवढे पुतळे आहे त्याचे ऑडिट झाले पाहिजे. ठाकरे आणि राणेंचा राडा काही नवीन नाही. दोघांना सुद्धा माहीत आहे राडे कसे करावेत. दोघे पण एक पक्षाचे होते. राणेंना कोणी बोललं तर ते उत्तरही तसंच देणार. त्यांचा वक्तव्याचा विपर्यास करू नये, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचे ठरलेले शब्द आहेत. ते विकासावर बोलत नाहीत. ते अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्यावर बोलत आहे. शिवाजी महाराज अस्मितेचा विषय आहे, त्यावर राजकारण करू नये. केसरकर यांच्या बोलण्याचा अर्थ याच्यापेक्षा चांगला पुतळा बसवू, असा असू शकतो. त्याचा अर्थ उलटा घेऊ नका, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
आणखी वाचा