रत्नागिरी: ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याठिकाणी राज्यकर्त्यांनी  शरमेने माना खाली घालून बसायला पाहिजे. लोकांना तत्वज्ञान सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनाही या घटनेबद्दल काहीही वाटत नाही, अशी  खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राजकोट येथील घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य मातीमोल ठरवले गेले. केवळ राज्यात नव्हे तर देशातील आणि जगातील शिवप्रेमींमध्ये झालेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्ते नालायक आहेत. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत त्यांना लाजलज्जा, शरम  काहीही नाही, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. ते बुधवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी भास्कर जाधव यांनी राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. 2019 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच घाईघाईने शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता. समुद्रकिनाऱ्यावर जोरदार हवा येणार हे सरकारला माहिती नव्हते का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. याशिवाय, विरोधी पक्षाचे लोक घटनास्थळी येत असतील तर त्यांना अडवण्याचे कारण काय? भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ राजकारणासाठीच केला जातो. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक हे त्याचे उदाहरण आहे. 2019 सालच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात वेगवेगळ्या नद्यांचं जल आणि माती आणून भूमिपूजन केले. तो पुतळा उभारला गेला का? राजकोट किल्ल्यावरील पुतळाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच उभा केला ना? किल्ले प्रतापगडावरील काँग्रेस सरकारच्या काळात 70 वर्षांपूर्वी बांधलेला अश्वारुढ पुतळा 125 किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्यामध्ये देखील दिमाखात उभा आहे. मात्र, आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा 45 किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्याने पडत असेल तर त्याला काय म्हणावे, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.


या घटनेची जबाबदारी आता कोणी घेणार नाही. कारण, लोकसभेला मतं मिळवण्यासाठी शिवरायांचा पुतळा उभारला. तो पुतळा उभारणारा आपटे नावाच्या माणसाने त्यापूर्वी किती पुतळे बनवले होते, किती साईजचे बनवले होते, जागेचा अभ्यास कोणी केला होता?, कोण इतिहासकार होते? फक्त आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करुन मतं मिळवण्याची रणनीती होती. ही मतं मिळाली पण आता पुतळा कोसळल्याची जबाबदारी कोण घेणार? कोणीच घ्यायला तयार नाही. हे सगळं लपवण्यासाठी राजकोट किल्ल्यावर नंगानाच केला जात आहे, यामुळे भाजप पक्ष आणखी नागवा होत आहे, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.


आणखी वाचा


राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे; कोणाला धमक्या देतील असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस