Maharashtra Political Crisis: ''हे बंड सत्तेतला वाटा जास्तीत जास्त मिळवा यासाठी करण्यात आलं आहे. महत्वाकांक्षा, लालसा, आमिष ही तीन सूत्र या बंडा मागे आहेत. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना यामधील कोणीच काही बोलला नाही. त्यावेळी महाराष्ट्रात नवीन प्रयोगाला सुरुवात होत आहे, अशी भूमिका यामधील सर्व लोकांनी घेतली. जर तुम्हाला हा विचार मान्य नव्हता. तर तुम्ही तेव्हाच यात सामील व्हायचं नव्हतं. मात्र तुम्ही स्वतःला हवी असलेली मलायदार खाते, इतर काही पदे, अधिकार, निर्णय घेतले. अडीच वर्षानंतर तुम्हाला असं वाटत आहे, हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना दूर होत आहे,  म्हणून आपण दूर जायला हवं. हे असं सांगणं असं बोलणं हे या राज्यातील जनतेला पटणार नाही, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. राज्यात राजकीय गदारोळ सुरू असताना त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. त्यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. 


संजय राऊत म्हणाले की, ''कोणत्या परिस्थितीत हे सरकार बनले, हे सर्वाना माहित आहे. आम्ही गेले 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षांसोबत होतो. 2014 साली हिंदुत्ववादी पक्ष असताना ही भाजपने आमच्याशी युती तोडली. तेव्हा हे सर्व आमच्या सोबत होते. त्यावेळी यामधील एकानेही काही म्हटले नाही. मी सोडून. मीच यासाठी भांडत होतो. निवडणूक तेव्हा झाली आम्ही जिंकलो, पुन्हा युती झाली. तेव्हाही हे लोक सरकारमध्ये गेले. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. मी त्यांच्या विषयी फार टोकाची टीका करेल किंवा काही, असं काही नाही. ते माझे जवळचे मित्र आहे. आमचं भावनिक नाते सुद्धा आहे. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आठ दिवसापूर्वी आम्ही दोघे एकसोबत अयोध्येत होतो.''


शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं : राऊत 


राऊत म्हणाले, ''शिंदे यांचा प्रश्न काय, तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हा हिंदुत्व वगैरे विचार, हे सर्व फोडणी आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं कोणी, तर भारतीय जनता पक्षाने. भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये शब्द पळाला असता, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद किंवा 50-50 पॉवर शेअरिंग, त्यात मुख्यमंत्रीपद सुद्धा होत. त्यावेळी भाजपने शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत ते जायला निघाले आहेत. 


संबंधित बातम्या: 


Sanjay Raut Majha Katta Highlights : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोरांची मंत्रीपदं 24 तासांत जाणार, माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे
Sanjay Raut Majha Katta Live: 16 जणांवर ईडीची कारवाई, दिल्लीत जाऊन केसेस क्लिअर केल्या जात आहेत : संजय राऊत