अमरावती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमधील घटकपक्षांमध्ये अद्याप मनोमीलन झाल्याचे दिसत नाही. कारण महायुतीमधील घटकपक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये आता आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वादाची भर पडली आहे. आनंदराव अडसूळ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचे सोडावे लागले तरी चालेल. पण तशी वेळ येणार नाही, असे वक्तव्य अडसूळ यांनी केले. ते शनिवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी आनंदराव अडसूळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता नवनीत राणा यांच्याविषयची मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे या जागेवरुन मी लढेन. नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे. तशी सवय आम्हाला नाही. आपण कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो. मात्र, राजकारणात काही लोक कपड्याशिवाय नग्न असतात, असे टीकास्त्र अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर सोडले.


नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर अडसूळांकडून भाष्य


अमरावती लोकसभा मतदारसंघ ही भाजपची जागा नव्हती. ही जागा शिवसेनेची आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या तरी त्यांना येथून उमेदवारी मिळणार का, हे पाहावे लागेल. पण आम्ही या मतदारसंघावरील आमचा दावा सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघातून लढू. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. कोर्टाच्या तारखा मॅनेज झाल्यात की त्या केल्या, हे संबंधितांनाच ठाऊक असेल. उच्च न्यायालयाने 108 पानांचे निकालपत्र दिले आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरवण्यात आले आहे, याकडे आनंदराव अडसूळ यांनी लक्ष वेधले.



भाजपमधूनही नवनीत राणांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध?


ज्यावेळी अमरावतीमध्ये महायुतीची बैठक झाली, त्यावेळी राजकुमार पटेल आणि बच्चू कडू गैरहजर होते. त्यांचंही म्हणणं आहे की, नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार असू नयेत. त्यामुळे आमचाही विरोध होता. नवनीत राणा आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना भाजपमध्येही पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात राज्यात आणि केंद्रामध्ये त्यांना विरोध दर्शविला आहे. नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीकडून किंवा त्यांना सपोर्ट देऊन चालणार नाही, अशी भावना भाजपचे कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत, असे वक्तव्य कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केले.


आणखी वाचा


देशात राहायचं असेल, तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, नवनीत राणा भर सभागृहात ओवेसींना भिडल्या