अहमदनगर : लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी अजित पवारांकडे बोट दाखवले आहे. गरज नसताना अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्यामुळे भाजपला फटका बसल्याचे संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून म्हटले आहे. एकीकडे निवडणूक निकालामुळे टीकेचे धनी होत असलेल्या अजित पवारांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाल्याचे वृत्त समोर आले. शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत (Shikhar Bank Scam Case) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृत्तानंतर माध्यमांत अनेक नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, आता अण्णा हजारेंनीच या वृत्तावर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे


शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अजित पवारांना लक्ष्य केलं जात असल्याचं काहींनी म्हटलं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांनाच लक्ष्य केलं होतं. मात्र, अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचं अण्णांनी म्हटलं.  


शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे, ते राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते. मी कधी बोलत नाही, बोललो नाही, मात्र माझं नाव आलं. मला धक्का बसला असं अण्णांनी म्हटलंय. तसेच, 15 वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता. पण, आता या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील, माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही, असे स्पष्ट शब्दात अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. 


संजय राऊतांनी केली होती टीका


"शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले, यांबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, मी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 


हेही वाचा


पालकमंत्री धनुभाऊंनी पुसले पीडित कुटुंबीयांचे अश्रू; पीडित वायभासेंच्या दोन्ही मुलांसाठी आर्थिक मदत