बीड : राज्याच्या राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेत आणि लक्षवेधी ठरलेली लढत म्हणजे बीड लोकसभा (Beed) मतदारसंघ. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. निवडणुकांमध्ये जय -पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच, पीडीत वायभासे कुटुंबीयांचे सांत्वनही केले.
दोन्ही मुलांच्या नावे अडीच लाखांची मुदत ठेव
मृत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात येत आहे.यावेळी शिवा शेकडे, सुधीर भाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायेभासे, सचिन घुले, प्रा कैलास वायभासे, विलास वायभासे, युवराज वायभासे देवळली चे सरपंच पोपट शेकडे, गंगादेवी चे सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते.
पराभवाचे जिल्ह्यात पडसाद
दरम्यान, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. सोशल मीडियातून पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा तणाव वाढला होता. त्यातून, पाथर्डी, परळी, शिरुर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, जिल्ह्यात 2 जणांनी आपले जीवन संपवल्याचीही घटना घडली. तर, काही पंकजा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेंना राज्यसभेवरुन घेऊन कॅबिनेटमंत्री करण्याची मागणीही डिजिटल बॅनर झळकावत केल्याचं पाहायला मिळालं.