मुंबई: देशातील निष्णात माजी सरकारी वकील आणि अनेक बड्या खटल्यात सरकारची बाजू मांडून दशतवाद्यांना, गुंडाना शिक्षा भोगायला भाग पाडणारे विधिज्ञ म्हणजे उज्वल निकम (Ujjwal Nikam). निकम यांना भाजपाने उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आपली उमेदवारी जाहीर होताच निकम यांनी भाजपाच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तर, उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. तसेच, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भेटही घेतली. मात्र, भाजपा विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्याजागी त्यांना संधी मिळाल्याने पूनम महाजन यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. पूनम महाजन मला नवीन नाही, प्रमोद महाजन हत्याप्रकरणावेळी मी त्यांच्याशी सातत्याने भेटत होतो, चर्चा करत होतो. आता, गेल्या 10 वर्षे त्यांनी या मतदारसंघात त्यांनी काम केलंय, त्यांच्याशी मी चर्चा करुन मतदारसंघातील प्रश्न समजावून घेईल, असेही निकम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले आहे.
उज्जल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोल करण्यात येऊ लागलं. समाज माध्यमात सक्रीय असलेल्या काहींनी थेट निकम यांच्या उमेदवारीचा संबंध शिवसेना फुटीनंतर लागलेल्या निकालाशीही जोडला. तर, अभिनेता किरण माने यांनी उज्जल निकम हे भाजपात नाही, तर तुरुंगात जायला हवे होते, अशा आशयाची भली मोठी पोस्टही केली होती. त्यामुळे, उज्जल निकम यांनी भाजपाचा पक्ष का निवडला, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यावर, निकम यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात स्पष्टपणे उत्तर दिलं.
उज्जल निकम यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, राजकीय पक्षाची निवड करताना भाजपाच का निवडला, भाजपातील आपले मार्गदर्शन कोण, अजमल कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती आणि अबु सालेमचं तुरुंगातून आलेलं पत्र यांसह अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच, आपण राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला, यावरही त्यांनी भाष्य केलं.
भाजपातच प्रवेश का, निकमांचे उत्तर
"मी राजकारणात यावं असं यापूर्वी 5 वर्षांअगोदर मला विचारण्यात आलं होतं. काही राजकीय पक्षांनी विनंती केली होती, त्यावेळी मी नकार दिला, मी येऊ शकत नाही. मात्र, यावेळी गेल्या 15 दिवसांत काही घडामोडी घडल्या की, मी राजकारणात यावं, मला कन्विन्स करण्यात आलं. न्यायालयात तु्म्ही विशिष्ट उंची गाठलेली आहे, जनमाणसांत तुम्ही माहिती झालेले आहात. आता, किती दिवस ते बे एकं बे.. असंच करायचं. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी गेलेलो आहे. देश बलवान करायचा असेल तर राजकारणात चांगली माणसं येणं गरजेचं आहे. तर, आमच्यासारख्या लोकांनी राजकारणाची एक प्रतिमा बनवली पाहिजे. लोकांना असं वाटतं की राजकारण वाईट आहे, राजकारणात चांगल्या माणसांनी येऊ नये, हा विचार चुकीचा आहे, असं मतही मला समजावून देण्यात आलं. मी स्वत: ज्यावेळी अभ्यास केला की कोणत्या राजकीय पक्षात जायचं, तेव्हा राष्ट्राची सुरक्षितता आणि दहशतवाद व तहाची बोलणी एकत्र होऊ शकत नाही, हे ठामपणे सांगणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदींचं ते एक वाक्य मला भावलं. त्यामुळे, मी सखोलपणे विचार केला, मी कधीच कोणाचा अंधभक्त राहिलो नाही व राहणारही नाही. पण, मोदी व त्यांच्या सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्या भावल्या म्हणून मी ही योग्य वेळ असल्याचे मत बनवून राजकारणात प्रवेश केला,'' असे स्पष्टीकरण उज्जल निकम यांनी राजकीय प्रवेशावर बोलताना दिले.
हेही वाचा