Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मराठा संघटना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने सोडवावा, अन्यथा येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मंत्रालयावर लाखांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी केली होती. त्यासाठी राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलनही छेडण्यात आले. त्यांच्या निधनानंतर याच मागणीवर संघटना आग्रही राहिली असे जावळे म्हणाले. अनेकदा मागणी करूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे नव्या सरकारने आमचा अंत पाहू नयेत. मराठा समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी आमची मागणी आहे. याच मागणीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात दौरे काढून नोव्हेंबरमध्ये मंत्रालयावर लाखांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा जावळे यांनी यावेळी दिला. 


सरकारने आमचा अंत पाहू नयेत...


समाजाच्या नावावर कोण खासदार, तर कोण आमदार होतेय, राजकीय स्वार्थासाठी केलेली ही समाजाची फसवणूक आहे, अशी टीका जावळे यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख न करता केली. तर तरुणांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून प्रचंड रोष आहे. त्यामुळे सरकारने आमचा अंत न पाहता लवकर यावर तोडगा काढावा असा इशाराही जावळे यांनी यावेळी दिला


पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अटक करण्याची मागणी...


एकीकडे छावा संघटनेकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेण्यात आली असतानाच, दुसरीकडे मराठा समाजातील महिलांविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या जळगावचे पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना जळगाव पोलिस पाठीशी घालत आहे का?, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तर येत्या दोन दिवसांत बकाले यांना अटक न झाल्यास मराठा समाज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करील, याची गंभीर दखल जळगाव पोलीस प्रशासनाने घ्यावी असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने देण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Shivsena Symbol: ठाकरे गटाची निवडणूक चिन्हावरून कोंडी? समता पार्टीकडून 'मशाल'वर दावा


अब्दुल सत्तारांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ?; दुसऱ्याच दिवशी सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्कची घोषणा