पुणे : राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांनाही युती किंवा आघाडी धर्म पाळायचा, वरिष्ठांचा आदेश पाळायचा म्हणून जुळवून घ्यावे लागत आहे. त्यामुळे, बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून नेतेमंडळी स्थानिक नेत्यांना कधी प्रेमाने तर कधी इशारा देऊन महायुती व आघाडी धर्म पाळण्याचे सांगत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज शिरुर मतदारसंघात आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेतून अजित पवारांनी आमदार अशोक पवार यांना सज्जड दम भरला होता. आता, मावळ (Maval) मतदारसंघातही अजित पवारांनी उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी फुल्ल बॅटींग करता, राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना गर्भित इशाराच दिला आहे.  यावेळी, आतून दुसऱ्याचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला, तर मतदारांना अंगठीचं आमिषही त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं


राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकाला, मला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे. राष्ट्रवादीच्या कोणी दगा-फटका केलेला मी सहन करणार नाही. सुनील शेळके जसं म्हणाला आणि बाळा भेगडेंना पडलेल्या मतांचा जो उल्लेख केला, याची बेरीज केल्यावर जे लीड दिसतंय तितकं लीड श्रीरंग बारणेंना मावळ मतदारसंघातून मिळायला हवा, असा शब्दात अजित पवारांनी राजी-नाराजी असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.  


त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. त्यावेळी श्रीरंग बारणेंच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्याने माझे पाय धरले, फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिले, असा प्रचार केला. पण, मी एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणेंनाच विजयी करण्याचं आवाहन येथील राष्ट्रवादी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. 


दरम्यान, येथील मतदारसंघात खालची टीम जरा गडबड करत आहे, माझं लक्ष आहे. सुनील शेळके बोलला आहे, जर गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन. तेंव्हा खालच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही गडबड करू नये, आपला उमेदवार हे श्रीरंग बारणे आहेत हे लक्षात ठेवा, असेही अजित पवार यांनी मावळमधील सभेत म्हटले. 


नातेवाईकांना पोशाख, अंगठी


मावळकरांनो ही निवडणूक महत्वाची आहे, नात्या-गोत्याचे राजकारण आणि विचार करू नका. नातेवाईकांना म्हणावं या, 13 तारखेला मतदान होणार आहे. 14 तारखेला या जेवण घालतो, पोशाख करतो हवं फार तर रुसू नये म्हणून अंगठी घालतो. या पद्धतीने सांगा आणि आत्ता कोणाला बोलावू नये, असे म्हणत अजित पवारांनी भरसभेतून मतदारांना अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला हे.