वाशिम : 2014 मध्ये काही प्रमाणात राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) पण चुका झाल्या आहेत. आपण लोकांना गृहीत धरायला लागतो, त्यावेळी लोकांच्या हिताचे निर्णय चुकतात. असं काही प्रमाणात त्यावेळेस झालं असेल. भाजपने ज्याप्रकारे भ्रष्टाचाराबाबत खोटा प्रचार केला, तेही कारण कदाचित असेल. त्यामुळे आम्ही 2014 मध्ये सत्तेत येऊ शकलो नाही. तेव्हा मोदींची हवा राज्यात आणि केंद्रात असल्यामुळे आमचा पराभव झाला. पुढे पाच वर्षाच्या काळात भाजप (BJP) सत्तेत राहिल्यामुळे त्यांचा आता अहंकार वाढला आहे. त्यामुळे लोकांना आता भाजपा नकोशी झाली आहे. आगामी 2024 ला भाजपचे सरकार येईल असं कुणालाही वाटत नाही. असा टोला रोहित पवारांनी (Rohit Pawar) सरकारला लगावला आहे. 


वाशिममधील संघर्षयात्रेदरम्यान रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. काही करणास्तव रोहित पवारांची संघर्षयात्रा ठप्प झाली होती. परंतु ती पुन्हा सुरु झाली. दरम्यान गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी ही यात्रा वाशिम जिल्ह्यात होती. 


मुख्यमंत्री बदलून काही होऊ शकत नाही - रोहित पवार 


माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)  यांनी म्हटलं होतं की, राष्ट्रवादीने आमचा पाठिंबा काढला नसता, तर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं. यावर उत्तर देतांना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून 2014 ला दुसऱ्याला संधी देण्याचा काँगेसचा विचार होता. यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. दोन-तीन महिन्यात मुख्यमंत्री बदलून काही होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास हा आपल्यावर असावा लागतो. आता या लोकांना सुद्धा कुठे ना कुठे लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. असे रोहित पवार म्हणाले. 


'वर्षभर त्यांना हेच सांगावं लागतंय' 


अजित पवार सांगतात लोकांची काम व्हावी, जास्त निधी मिळावा यासाठी आम्ही सत्तेत गेलो. याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यावेळी ते म्हणले की, वर्षभर त्यांना हेच सांगावं लागतं, की आम्ही आदरणीय पवार साहेबांना का सोडलं?  याच्यावरून तुम्ही समजून घ्या की लोकांना ते पटलेले नाही. त्यांना सातत्याने हेच सांगावं लागतंय आम्ही साहेबांना का सोडलं. त्यामुळे अजून दहा वर्ष त्यांनी घालवले तरी लोकांना ते खरं वाटणार नाही. लोकांना खरं काय ते माहित आहे. त्यामुळे ते बोलत राहतील, पण लोकं 2024 ला करून दाखवतील. असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. 
 


तर दादा चांगले मुख्यमंत्री झाले असते - रोहित पवार 


अजित पवार आणि त्यांच्याबरोबर काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही दुःखी होतो. ते यासाठी की दादांमध्ये एक क्षमता आहे. पुरोगामी विचाराबरोबर दादा राहिले असते तर चांगले मुख्यमंत्री ते होऊ शकले असते. पण जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा पक्ष भाजप बरोबर जातो तेव्हा भाजप टप्प्याटप्प्याने त्या व्यक्तीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करते. आज आपण सर्वांनी हे होताना बघितलं आहे.  ज्या नेत्यांनी अजित  पवारांच्या कानात  बोलून निर्णय घ्यायला लावला, तेच आता येत्या काळात त्या गटाबरोबर राहणार नाहीत. ते  भाजपसोबत जातील आणि कदाचित त्याची सुरुवात ही भुजबळ यांच्यामुळे झाली असेल असं वाटते. अस देखील रोहित पवार म्हणाले. 


'प्रामाणिकपणे लढणाऱ्या लोकांना रडावं लागत नाही'


1999 ला पवार साहेब काँग्रेस मधून बाहेर निघाले. त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा चिन्ह नवीन होतं, नेतेही नवीन होते. पण साहेबांनी त्यांना संधी दिली, चिन्ह लोकांमध्ये घेऊन गेले. तेव्हा इंटरनेट नव्हतं,  what's app नव्हतं. तरी सुद्धा लोकांनी ते स्वीकारलं. त्याला कारण लोक पवार साहेबांना स्विकारतात. आता जरी आमच्याकडे चिन्ह राहिले नाही, तरी आमच्याकडे पवार साहेब आहेत. आमच्याकडे त्यांचे विचार आहेत. मला वाटत नाहीत हे लोक विचाराला रॉयल आहेत. त्या लोकांनी विचार सत्तेसाठी आणि स्वतःसाठी बदललेला आहे. त्यांना ग्लिसरीन लावून सुद्धा रडू येऊ शकत नाही. कारण त्या लोकांना हृदय नाहीये. सामान्य लोकांना हृदय आहे आणि आम्ही सामान्य लोकांबरोबर आहोत.  त्यामुळे आम्हाला ग्लिसरीनची गरज लागणार नाही. जेव्हा आम्ही रडू तेव्हा जे अश्रू असतील ते खरे असतील आणि ते आनंदाचे असतील. ग्लिसरीन घेऊन आम्हाला नाही तर त्यांनाच ग्लिसरीन घेऊन बसावं लागेल असे प्रतिउत्तर रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना दिले.


हेही वाचा : 


Dhananjay Munde : अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा