Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात सहा उमेदवारांची नावे आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 19 ऑक्टोबर रोजी 62 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हिमाचल प्रदेश विधानसभेत 68 जागा आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे नावही दुसऱ्या यादीत नाही. यावरून आता ते निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


दुसऱ्या यादीत भाजपने देहरा मतदारसंघातून रमेश धवला यांना उमेदवारी दिली आहे. तसंच ज्वालामुखी मतदारसंघातून रवींद्र सिंग रवी, कुल्लूमधून महेश्वर सिंग, बडसरमधून माया शर्मा, हरोलीमधून राम कुमार, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामपूरमधून कौल नेगी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपनं आपल्या 62 उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. त्याची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती. 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


भाजपची पहिली यादी


भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 19 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. हे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत पाच डॉक्टर आणि एका निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याची (आयएएस) नावे आहेत. भाजपने शिमल्याच्या आयजीएमसी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांना भरमौरमधून, अॅलोपॅथिक डॉक्टर राजेश कश्यप आणि डॉ. अनिल धीमान यांना सोलन आणि भोरंजमधून, आयुर्वेदिक डॉक्टर राजीव सैजल यांना कसौलीतून आणि राजीव बिंदल यांना नाहानमधून तिकीट देण्यात आले आहे. निवृत्त आयएएस अधिकारी जेआर कटवाल यांना झंडुटा येथून तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पाच महिलांची नावे आहेत. शाहपूर मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री सरवीन चौधरी पुन्हा रिंगणात आहेत. सिराजमधून मुख्यमंत्री जयराम ठाकूर उमेदवार असतील.


11 आमदारांची तिकिटे कापली


तर आमदार रीना कश्यप यांना पच्छाडमधून तर रिटा धीमान यांना इंदोरा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. यासोबतच भाजपने पहिल्या यादीत मंत्री महेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह 11 आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्याचबरोबर दोन मंत्र्यांचे विधानसभा मतदारसंघही बदलण्यात आले आहेत.


संबंधित बातमी: 


Himachal Pradesh Election 2022 : हिमाचलमध्ये भाजपकडून 62 जणांची पहिली यादी जाहीर, विद्यमान 11 आमदारांना झटका, नवीन चेहऱ्यांना संधी