Mumbai News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) सभा घेणार आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर (Sanjay Ghadigaonkar) आणि यवतमाळचे माजी आमदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी लवकरच ठाण्यात सभा घेण्याची सूचना त्यांनी केली. तसंच पोहरादेवीचा (Poharadevi) दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.


आता ठाणे म्हणजे चिडीचूप असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. चिडीचूप झाले नाही पण ते चिडीने पेटून उठले आहेत. पोहरादेवीला मेळावा घ्यायचे जाहीर केले आहे. आता मी ठाण्यात पण सभा घेईन. तुम्ही ठाण्यात सभा लावा मी आलोच असे समजा, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.


पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "सध्या माझी भूमिका ही एखाद्या शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलतात पण शिक्षक एकच आहे आणि बोलायचं तेच असतं. आताही तुम्ही येता पाहिलं असेल की गर्दी होती. मी प्रयत्न करत होतो दोन वर्ग एकत्र घ्यायचा पण ते मावणार नाही. हेच आपलं वैभव आहे."


आघात झाले तेव्हा शिवसेना शतपटीने मोठी झाली : उद्धव ठाकरे
शिवसेने संपवायला जे प्रयत्न करत होते त्यांना कल्पना नव्हती की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दसपटीने नाही शतपटीने मोठी झालेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. "काही जण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही. का करु विनंती, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात. तुम्ही आडवे गेला नसता तर दसरा मेळावा सोपा झाला असता. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली. त्यांनी चिन्ह गोठवलं. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असला तर मी अजून चिडून कामाला लागतो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


कार्यकर्त्यांसह संजय घाडीगांवकर ठाकरे गटात
ठाण्यातील माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांची घरवापसी झाली आहे. संजय घाडीगांवकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. संजय घाडीगांवकर हे 18 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. आज त्यांनी शिवबंधन हातात बांधलं.


माजी आमदार संजय देशमुख यांच्या हाती शिवबंधन
तर यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. संजय देशमुख हे शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिलं जात आहे. संजय देशमुख यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच."