Himachal Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस आता चांगलीच सक्रिय झाली आहे. या राज्यात प्रत्येक पाच वर्षाने सत्ता बदल होतो. असा येथील आतापर्यंत राजकीय निवडणुकींचा इतिहास आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र यंदा काँग्रेस येथे सत्ता स्थापन करणार, अशी शक्यात काँग्रेस नेत्यांकडून वर्तवली जात आहे. अशातच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (priyanka gandhi ) वाड्रा या हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या आहेत. हिमाचल निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यासह अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत. तसेच सत्तेत असलेल्या भाजपवरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत त्या म्हणाल्या आहेत की, औषध बदलल्याने रोग बरा होत नाही, अशी वक्तव्य दिशाभूल करण्यासाठी केली जात आहेत. हे जनतेने समजून घेतले पाहिजे. त्या म्हणाल्या की, हिमाचलमधून भाजपचे अनेक मोठे नेते आहेत. पण त्यांनी जनतेच्या प्रगतीकडे लक्ष दिले नाही.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi ) यांनी येथील एक सभेत जनतेला संबोधित करताना म्हटले होते की, वारंवार औषध बदलणे रोगाच्या उपचारात ठीक नाही. त्याचा परिणाम पाहण्यासाठी तुम्हाला तेच औषध दीर्घकाळ घ्यावे लागेल. दर आठवड्याला वेगवेगळी औषधे घेतल्याने कोणालाही फायदा होणार नाही. हिमाचल प्रदेशनेही तीच चूक केली आहे. यावरच पंतप्रधानांचे नाव न घेता प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप नेते म्हणतात की औषध बदलल्याने आजार बरा होत नाही. हिमाचल प्रदेश आणि तेथील लोक आजारी आहेत का? बघा तुम्हाला (जनतेला) कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. तुम्ही आजारी असल्याचे सांगितले जात आहे. तुमची दिशाभूल केली जात आहे, हे समजून घ्या. त्या म्हणाले की, भाजप सरकारमध्ये मोजक्याच उद्योगपतींच्या इंजिनात इंधन भरले जात आहे.