Abdul Sattars Remark On Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नाही तर विविध पक्षातून आणि क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत टीका करताना भान राखलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सगळ्यांनीच दिली आहे.
अब्दुल सत्तार यांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.
अब्दुल सत्तार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया
वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पुणे ग्रामीण
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या शिवराळ भाषेचा वापर केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या, अन्यथा सत्तार यांना रस्त्यावर फिरु दिलं जाणार नाही. हा शिवछत्रपती यांचा महाराष्ट्र आहे आणि इथे महिला भगिनींचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पुण ग्रामीणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिली.
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलू शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. आदरणीय सुप्रियाताईंबद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करुन परत घ्या नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं
पंकजा मुंडे, भाजप नेत्या
मी मंत्र्यांचं वक्तव्या पाहिलेलं नाही. परंतु कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलांबद्दल किंवा पुरुषांबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
दीपाली सय्यद, शिवसेना नेत्या
अब्दुल सत्तार यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. तर अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागितली पाहिजे, असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं.
चित्रा वाघ, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ म्हणाल्या की, महिलांचा अपमान करणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारच नाही तर कोणत्याही नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करु नये. परंतु 50 खोक्यांवरुन ज्याप्रकारे राळ उठवण्यात आली, अपमानित करण्यात आलं त्याला हे प्रत्युत्तर आहे."
नीरजा, कवयित्री
राजकारणात अतिशय बीभत्स भाषा वापरली जात आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण तो पुरोगामी राहिलाय का? जेव्हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तेव्हा संस्कृतीप्रमाणे भाषाही फार महत्त्वाची असते असं मला वाटतं. आज राजकारणात स्त्रियांची भाषा अतिशय वाईट आहे. स्त्रियांबद्दल जी भाषा वापरता त्याचा राजकारण्यांनी विचार करायला हवा. कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांकडे आजही वस्तू म्हणून पाहिलं जातं, अशी प्रतिक्रिया कवयित्री नीरजा यांनी म्हटलं.
पारोमिता गोस्वामी, सामाजिक कार्यकर्त्या
मला फारच धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांनी फारच वाईट शब्द वापरले आहेत. त्यांनी माफी मागायला हवी. एकतर असे शब्द वापरुन आपण माघार घेणार नाही, असं बोलत आहेत. त्यांनी माघार घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या महिला त्यांना माफ करणार नाही. महाराष्ट्रातील महिलाच त्यांना माघार घ्यायला लावणार आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी दिली.
अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघेंचे शिष्य मानता तर अशा मंत्र्याकडून त्याचा तातडीने राजीनामा घ्यावा. मला पवार कुटुंबाविषयी आपलेपणा नाही. परंतु अशाप्रकारची भाषा वापरणं अतिशय चुकीचं आहे, अशी टीका सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत हीन दर्जामध्ये शब्दात वक्तव केलं आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. एखाद्या महिलेबद्दल अशाप्रकारे अभद्र शब्द वापरणं म्हणजे संस्कारहीनतेचं लक्षण आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले नाहीत, त्यामुळे एकदा नाही तर वारंवार अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना शिकवण्याची गरज आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, अशी माझी मागणी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.