इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) जाहीर प्रवेश केला. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayan Patil) यांनी  इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


जयंत पाटील म्हणाले की,  इंदापूरचा निकाल काय लागेल? हे आताच जाहीर झालं आहे. 2019 साली आमचे नेते सोडून जात होते.अ,ब,क,ड गेला तरी चालेल कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. दिल्ली पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न करते. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, असे दिल्लीला वाटते. हर्षवर्धन पाटील तुम्ही स्वग्रही येत आहे. आधी आमच्याकडे गर्दी जास्त होती. ती आता कमी झाली. त्यामुळे आता येत आहात त्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार 200 टक्के येणार 


ते पुढे म्हणाले की, ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या लाडक्या झाल्या. तुम्ही मतदान करून बाहेर आला की तुम्हाला तेच मिळणार जे या मतदारसंघात बहिणीला द्यायची प्रथा आहे. महाविकास आघाडी चांगल्या योजना तुमच्यासाठी आणेल. गृहमंत्री नागपूरचे आहेत. तिथं पोलीस टेबलवर बसून जुगार खेळताना महाराष्ट्राने पाहिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार 200 टक्के सत्तेत येणार आहे. 


साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक लोक उत्सुक 


सरकारने आता ज्या योजना देण्याचा निर्णय घेतलाय ते करताना कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे अनेक योजना बंद पडल्यात. आमचे सरकार आल्यानंतर आणखी चांगल्या योजना राबवू. मी महिला सुरक्षिततेची हमी देतो. आपल्याला इंदापूर विधानसभेची जागा आपल्याला निवडून आणायची आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. 


इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं


मी पाटील यांना लोकसभेच्या आधी फोन केला होता. त्यांना सांगितले की निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितले की शक्य आहे ते आम्ही करू. परत ते फोन टाळायला लागले मग मी बावड्यात जाऊन सभा घेतली. इंदापूरमध्ये विजय आवश्यक आहे म्हणून आम्ही हर्षवर्धन पाटलांना आमंत्रित केलं आणि ते आमच्या पक्षात आले. रामाने भाजपाला सोडले आहे हे उत्तम जाणकारांना माहित नाही. रामाने भाजपला नाकारलं आहे. इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, अशी आमची इच्छा आहे. महावीर आघाडीचे जागा वाटप होईपर्यंत मला उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे, असे म्हणत एकप्रकारे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. 


आणखी वाचा 


Harshvardhan Patil: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना गुलिगत धोका; भाषणाला सुरुवात होताच हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट