मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित होता पण मागील दोन अडीच वर्षात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये 87 टक्के वाढ झाली आहे. 4-6 वर्षांच्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.


वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काळी फित लावून आंदोलन


बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात धारावी व नागपाडा जंक्शन येथे खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काळी फित लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, महिनाभरात कोल्हापूर, अकोला, नागपूर, ठाणे, बदलापूर, शिळफाटा, उरण, मुंबईत समतानगर, हनुमाननगर मध्ये मुली व महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. शाळा, हॉस्पिटल, रेल्वे, मंदिर, कुठेच महिला सुरक्षित नाहीत. बदलापूरच्या पीडितांची तक्रार घेण्यासाठी 11 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. ऍड. गुणरत्ने सदावर्ते महिला व मुलींना न्याय देण्याची लढाई लढले असते तर बरे झाले असते. लाडकी बहिण नको पण सुरक्षित बहिण पाहिजे ही मागणी महिलांमधून जोर धरत आहे. हा लढा माता भगिनींच्या रक्षणासाठी आहे, जोपर्यंत मुली, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणार नाही तोपर्यत ही लढाई सुरु राहिल असा निर्धार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.


शक्ती कायदा केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे


भाजपा सरकार महिलांबद्दल असंवेदनशील आहे, शक्ती कायदा केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे आणि भाजपाचे नेते महिलांना संरक्षण देण्याच्या गप्पा मारत आहेत. बदलापूर प्रकरणी भाजपा सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकार वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसची, उज्ज्वल निकम हे भाजपाचे कार्यकर्ते, लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचे उमेदवार होते मग ते पीडित मुलींना न्याय देणार की भाजपाच्या संस्थेला वाचवणार हे वेगळे सांगायची गरज नाही, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.


या आंदोलनात माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, निजामुद्दीन राईन, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, डॉ ज्योती गायकवाड, रवी जाधव, मंदार पवार, हिना गजाली व इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी बोलणार नाही, पण शिवसेनेसोबत RPI कायम असेल, आमदार योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ