पुणे: पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली . पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केले, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्लू गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली, त्यानंतर एकाने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पुणे पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा. या विकृतांना ठेचून काढले पाहिजे, असे रुपाली ठोबरे यांनी म्हटले आहे.
व्हिडिओत काय दिसतंय?
पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य करताना दिसतात. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.
मागील घटनेतून पुणे पोलिसांनी धडा घेतला नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.
त्यांना संस्कार नावाची गोष्ट आहे का?
सुसंस्कृत पुण्यामध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगार लोकांचे विकृती बिघडत चाललेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर बीएमडब्ल्यू सारख्याकार मध्ये फिरणारे रस्त्यावर लघुशंका करतात. हे किती निर्लज्ज लोक आहेत. त्यांना संस्कार नावाची गोष्ट आहे का? इतक्या मोठ्या गाडीतून फिरतो आहे. चांगलं शिक्षण झालेलं असणार आहे. तो शौचालयामध्ये जाऊ शकत होता. हॉटेलमध्ये जाऊ शकत होता. इतका पैशाचा माज आहे. तर त्या हॉटेलमध्ये शौचालयामध्ये जाण्यासाठी पाच रुपये घेतात. तर हॉटेलमध्ये जाऊन शंभर रुपये देऊन लघुशंका करावी. ही विकृती दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत. त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. परंतु सर्व समाजातील लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण असे विकृत काहीतरी प्रकार केले कायद्याची जरब मोठी करण्यात आलेली आहे. एकालाही सोडता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या भागात लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परिसरात घडलेल्या घटना सीसीटीव्ही आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, असंही रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
जेव्हा घटना घडते तेव्हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस कारवाईला सुरुवात करतात, असं चालणार नाही. सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपला कार्यकर्ता असेल आणि त्याने असा काही गुन्हा केला तर त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत या गुन्हेगारीवर वचक बसणार नाही, आपल्याला चुकीला चूक म्हणावंच लागेल, त्यांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. .
पोलीस अजूनही गांभीर्याने धडा घेत नसतील तर..-सुषमा अंधारे
सुषमा अंधारे या प्रकरणावर बोलताना म्हणाल्या, असं कोणीतरी सुसंसकृत शहराला गालबोट लावते हे एक पुणेकर म्हणून माझ्यासाठी फार दुःखद आहे. मात्र, पुण्यात वारंवार ज्या घटना घडत आहेत, त्या घटना पाहता पुणे पोलिसांना अजूनही या घटनांचा गांभीर्य कळत नाही की, पुण्यातील शासन प्रशासन चालवणाऱ्या पुण्यातील मान्यवरांना याच्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही, हे नेमकं कळत नाही. कारण ज्या शास्त्रीनगर येरवडा भागात आजचा प्रकार आहे, याच भागामध्ये साधारण एक महिना भरापूर्वी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर हा आयटी क्षेत्रातील महिला आणि तरुणी काम करणाऱ्यांचा मोठा भाग आहे. या ठिकाणी त्या रात्रीच्या देखील शिफ्ट करत असतात. या गजबजलेल्या परिसरात पोलीस अजूनही गांभीर्याने धडा घेत नसतील तर चिंता वाटते. पहिली घटना घडून देखील या ठिकाणी गस्त घालणं, पेट्रोलिंग वाढत नसेल तर हे गंभीर आहे, वारंवार हे सांगून सुद्धा स्थानिक मंत्री किंवा पोलीस प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे, असेही पुढे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत,त्यामुळे वाघोली पोलीस स्टेशन असेल किंवा लोहगाव पोलीस स्टेशन विमान नगर शास्त्रीनगर त्याचबरोबर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा काही वचक आहे की नाही प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी मंत्री त्यांना सूचना देत नाहीत का? त्यांना नक्की अडवते कोण? हा गोंधळ कळत नाही पुण्यातला सुरक्षित वातावरण होतं ते कमालीचा अस्थिर झालेला आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यावेळी बोलताना म्हणाल्या, शहराचं वेगाने झालेलं नागरिकरण, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुणे शहराचा झालेला विस्तारीकरण, पुणे शहराच्या काठावरची गाव, यांची गेल्या वीस वर्षांमध्ये लोकसंख्या दहापट वाढली आहे. 40-50 गावे पुणे शहरात समाविष्ट झाली आहेत. पोलिसांची देखील ग्रामीण आणि शहरी भागातील संख्या कमी आहे, प्रत्येक गोष्टीचा दोष पोलिसांवर टाकणं योग्य नाही. या संबंधित व्यक्ती कोण आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या तरुणाला लाज लज्जा वाटत नाही. तो अशा प्रकारे रस्त्यात कृत्य करत आहे.
मुळात पुणे शहर पोलिसांनी परिवहन विभागाने आणि उत्पादन शुल्क विभागाने एक सहा महिन्यापूर्वी खूप ठिकाणी तोड काम केलं. पबमध्ये, बारमध्ये कारवाई केली, लहान मुलांना ओळखपत्र दाखवणं हे कंपल्सरी केलं किंवा वयाचा दाखला देणे गरजेचे केलं. त्यानंतर आता देखील कडक कारवाईच्या सूचना मी सरकारला करणार आहे. गृह विभाग परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी मिळून या संदर्भात एक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. यामध्ये देखील लोकांचा सहभाग पाहिजे. अशा माणसांना पशु देखील म्हणू शकत नाही, पशूंना कळत नसतं ते काय करत आहेत, ही घटना घडली आहे, त्याची दखल पोलीस घेतील. पण, मी देखील पुणे पोलीस आणि नगरपालिका यांच्याशी बोलून याची दखल घेऊन अशा गोष्टी ताबडतोब बंद होतील याकडे लक्ष देईन असं नीलम गोऱ्हेंनी म्हटंल आहे.