Arvind Kejriwal On Bjp: गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येथे सत्तेत असलेल्या भाजपाला (BJP) यावेळी काँग्रेसोबतच (Congress) आम आदमी पक्षाचेही (AAP) मोठे आव्हान आहे. भाजपसाठी गुजरात (Gujarat) हे खूप महत्वाचे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) याच राज्यातून येतात. प्रचाराच्या बाबतीत भाजप (BJP) जशी पुढे आहे, तीच स्टाईल आपचीही असल्याचं दिसतं. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. स्वतः आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सातत्याने गुजरात दौरा करत असून अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या आहेत. अशातच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली, तर भाजप केंद्रीय यंत्रणांच्या तपासात अडकलेले मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना सोडेल, अशी भाजपने त्यांना ऑफर दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
अरविंद केरीवाल यांनी भाजपवर आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्षाने आधी मनीष सिसोदिया यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, आता ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाला सोडून दिल्लेचे मुख्यमंत्री बनण्याचा भाजपचा प्रस्ताव मनीष सिसोदिया यांनी नाकारला होता. ते म्हणाले, ''गुजरात सोडून निवडणूक न लढवल्यास ते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध सुरु असलेला केंद्रीय यंत्रणांचा तपास बंद करतील. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप हटवले जातील.'' ही ऑफर तुम्हाला कोणी दिली असं त्यांना विचारलं असता, केजरीवाल म्हणाले की, ''मी माझ्या कोणाचे नाव कसं घेऊ शकतो, हा प्रस्ताव त्यांच्याकडून आला होता. ते (BJP) कधी सरळ संपर्क करत नाही. ते एकाकडून दुसऱ्या मित्राकडे जातात आणि त्यांच्या माध्यमातून संदेश पाठवतात.''
अरविंद केजवरील पुढे म्हणाले आहेत की, दिल्लीत एमसीडी निवडणुका एकाचवेळी घेऊन केजरीवाल यांना घेरल्याचे दिसत नाही. तर यावरून भाजप घाबरल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, दोन्ही जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असता तर त्यांनी असा आग्रह धरला नसता. भाजपला गुजरात आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीत पराभव होण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची खात्री केली आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीत भाजपला आप कडवे आव्हान निर्माण करत असल्याचं चित्र आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.