Gujarat Election 2022: हिमाचलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या अखेरीस होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election) दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. पहिला टप्पा नोव्हेंबरच्या शेवटी आणि दुसरा टप्पा 4-5 डिसेंबरच्या आसपास मतदान होऊ शकते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबत गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही 8 डिसेंबरला होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 14 व्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. यापूर्वी 182 जागांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर 2017 मध्ये (Gujarat Election 2017) झाल्या होत्या. निवडणुकीत विजय मिळवून भाजपने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आणि विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केली होती.


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election) आयोगाने पूर्ण तयारी केलीय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आयोग कधीही याची घोषणा करू शकतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अनेक पथकांनी गुजरातला भेट दिली असून त्यांनी परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आहे. दुसरीकडे गुजरातमधील सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.


गुजरातमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप सरकार गुजरातमध्ये सत्ता टिकवण्यासाठी गौरव यात्रा काढत आहे. दुसरीकडे गुजरातच्या भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज झाला आहे. त्याचबरोबर भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या? (Gujarat Election 2017)


गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. त्यापैकी 40 जागा राखीव आहेत. यापैकी 13 जागा अनुसूचित जातीसाठी तर 27 जागा अनुसूचित जमाती आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसच्या खात्यात 77 जागा आल्या. याशिवाय भारतीय आदिवासी पक्षाला 2 जागांमध्ये 1 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Asaduddin Owaisi:पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित