(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Governor Nominated MLC : अखेर 12 नावांसाठी शिंदे-फडणवीस सरकार सज्ज, शिंदे गट-भाजपमधील संभाव्य नावं
Governor Nominated MLC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच 12 नावं राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झालं आहे. या 12 नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॅाबिंग सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Governor Nominated MLC : नवं सरकार सत्तेत येताच सगळीच राजकीय समीकरणं बदलून जातात हे काही नवं सांगायला नको. राज्यपाल नियुक्त 12 नावांवरुन महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyri) विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला होता. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून लवकरच 12 नावं राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झालं आहे. या 12 नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॅाबिंग सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या 12 नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे आणि फडणवीस यांच्यासमोर आहे. 2019 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॅाबिंग करत आहेत.
मविआ सरकारची यादी शेवटपर्यंत राज्यपालांकडून प्रलंबित
महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. पण, राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत भाष्य केलं. याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी यासाठी राज्यपालांच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र तरीही सदस्य नियुक्तीच्या यादीची फाईल पुढे सरकली नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता.
मविआच्या यादीत कोणाकोणाचा समावेश होता?
महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये ज्यांची नावे दिली होती त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या चार सदस्यांचा समावेश होता. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा; तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांचा समावेश होता.
पाहुयात शिंदे गटातल्या संभाव्य नावांवर
1. रामदास कदम
2. विजय बापु शिवतारे
3. आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ
4. अर्जुन खोतकर
5. नरेश मस्के
6. चंद्रकांत रघुवंशी
भाजपमधली संभाव्य नावं
1. चित्रा वाघ
2. कृपाशंकर सिंह
3. हर्षवर्धन पाटील
4. पंकजा मुंडे
5. गणेश हाके
6. सुधाकर भालेराव
आता ही नावं कधी पाठवली जात आहेत आणि कोणाकोणाला संधी मिळणार? याचीच चर्चा जास्त आहे