Beed: ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी बीडमधून एक लाख पोस्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठवण्यात येणार आहेत आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ आणि ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके (Hari Narke) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणावरून बोलताना हरी नरके यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली.
'गोपीनाथ मुंडे दिलदार, पण त्यांच्या वारसांनी ओबीसींसाठी काय केलं?'
छगन भुजबळ यांनी ज्यावेळी ओबीसीची जनगणना करण्याचा प्रस्ताव संसदेमध्ये मांडला होता, त्यावेळी हे सर्व प्रकरण गोपीनाथ मुंडे साहेबांनी समजून घेतलं होतं आणि या प्रस्तावाला त्यांनी स्वतः पाठिंबा दर्शवला होता, असं हरी नरके म्हणाले. ओबीसी समाजासाठी मुंडे साहेब हे एक दिलदार नेते होते, मात्र आज त्यांचं नाव लावून त्यांचे वारस म्हणून फिरणाऱ्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगावं, असं म्हणत हरी नरके यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
'बजेटमध्ये प्रत्येक ओबीसीला फक्त दोन रुपये'
भाजप सरकारने ओबीसींसाठी जे बजेट जाहीर केलं आहे, त्या बजेटप्रमाणे प्रत्येक ओबीसी व्यक्तीला फक्त दोन रुपये मिळत आहेत, असं म्हणत हरी नरके यांनी पुण्यातल्या एका भिकाऱ्याचा भन्नाट किस्सा सांगितला. आजकाल भिकारी देखील दोन रुपये घेत नाहीत, असं म्हणत आपल्या हक्कासाठी आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे, असं देखील हरी नरके म्हणाले.
'फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांची आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची लायकी नाही'
ओबीसी समाजाला मुख्य प्रश्नापासून दूर करण्यासाठी भाजप सरकार राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहे, असं हरी नरके म्हणाले. आम्हाला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महाराज शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मान्य आहे, त्यामुळे मोदी आणि फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची त्यांची लायकी नसल्याचे देखील हरी नरके म्हणाले. ओबीसी समाजाला त्यांच्या अधिकाराची जाणीव होऊ नये, यासाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचे मुद्दे पुढे करून भाजप सरकार सत्तेत आल्याचं हरी नरके म्हणाले.
हेही वाचा: