Ashadhi Wari 2023 : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhr Rao) हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत.  ते सोमवारी रात्री तेलंगणातून निघतील आणि रात्रीचा मुक्काम हा सोलापूरमध्ये करणार आहे. विशेष म्हणजे के चंद्रशेखर राव हे संपूर्ण प्रवास बाय रोड करणार आहेत.  के चंद्रशेखर राव हे यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात आले आहेत. मात्र पहिल्यांदाच दोन दिवसांचा चारचाकीने प्रवास करून ते राज्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या पंढरपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहे. तर सोबत तेलंगणा राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील त्यांच्यासोबत असणार आहे. आषाढीच्या एक दिवस आधी केसीआर हे आपल्या मंत्रीमंडळासह पंढरपुरात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे परवानगी मिळाली तर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी देखील बीआरएस पक्षाकडून केली जाणार आहे. तर एकाचवेळी संपूर्ण मंत्रिमंडळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असल्याची इतिहासातील पहिलीच घटना असणार आहे. विशेष म्हणजे केसीआर यांच्या या दौऱ्याचे वेगेवेगळ्या पद्धतीने राजकीय अंदाज देखील लावले जात आहे. 


चंद्रशेखर राव हे 26 जूनला हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने येतील, रात्रीचा मुक्काम हा त्यांचा सोलापूरमध्ये असणार आहे. 28 तारखेला सकाळी सोलापूरवरून पंढरपूरकडे निघतील. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांची संवाद आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी त्यांच्यासोबत तेलंगणातील संपूर्ण मंत्रिमंडळ असणार आहे. 


पोलिसांवर ताण पडणार...


आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातील वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. त्यामुळे ही संख्या लाखोच्या घरात असते. यासाठी सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पोलीस देखील बंदोबस्तसाठी पंढरपुरात बोलवण्यात येत असते. त्यातच आता 28 तारखेला म्हणजेच आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचं ताण पडण्याची शक्यता आहे. कारण यात अनेक मंत्री असणार आहेत. सोबतच बीआरएस पक्षाचे राज्यातील महत्वाचे नेते देखील असणार आहे. त्यामुळे मंत्र्यांना असणार विशेष पोलीस बंदोबस्त देखील पोलिसांना पुरवावा लागणार आहे. अशा या सर्व परिस्थितीत पोलिसांकडून  सूक्ष्म अभ्यास करण्यात येत असून, त्या दृष्टीने बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023 : नाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात; आज संजीवनी समाधी मंदिरात होणार संतभेट