Crop Insurance : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांसह फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. याबाबत कृषिमंत्री सतत आपल्या भाषणात उल्लेख देखील करताना पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात एक रुपयात विमा देण्याचा सरकारी आदेशच निघाला नसल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबत ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. काही पिकांचा विमा भरण्याची मुदत संपली असून, अजूनही सरकारने आदेश काढला नसल्याचं आरोप दानवे यांनी केला आहे. 


दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजून एक ठेंगा या खोके सरकारने दिला आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची घोषणा महाशक्तीच्या महाराष्ट्र शाखेने केली होती. परंतु त्याचा सरकारी आदेश अजून काढलेलाच नाही. खरीप हंगामातील पीक विम्याचा हफ्ता भरण्याची मुदत काही पिकांबाबत आटोपली, काहींची आटोपण्यात आली आहे. शेतकऱ्याला पीक विम्याचे संपूर्ण पैसे भरल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण या योजनेचा आदेशच सरकारने अजून काढला नसल्याचं दानवे यांनी म्हटले आहे. 






नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम 


शिंदे-फडणवीस सरकराने मोठं गाजावाजा करत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत सरकारने अजूनही कुठलाही जीआर काढला नाही. तर संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख 14  जून असल्याने ती मुदत देखील संपली आहे. तसेच मोसंबी फळपीक विमा काढण्याची देखील अंतिम तारीख 30  जून आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडून खरीप पिकांचा विमा काढला जात आहे. परंतु एक रुपयात पीक विमा देण्याबाबत राज्य सरकारचा कुठलाही जीआर निघाला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरावी लागत आहे.  


मंत्र्याची फक्त घोषणाबाजीच...


राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रत्येक शेतकऱ्याचा एक रुपयात पीक विमा काढणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकराने केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत शेतकऱ्यांना आम्ही एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख केला जात आहे. आपल्या भाषणात देखील सत्ताधारी नेते याचा सतत उल्लेख करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ही योजना घोषणाबाजीच ठरत असल्याचा आरोप होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maharashtra Budget : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये; पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा