Gopichand Padalkar: माझा घेर आता मी बदललेला आहे. आता माझा मोड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही, मी आता बाळूमामाच्या मोडमध्ये गेलो आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयम राखायला सांगितला आहे. पण माझा संयम हा मंत्रिपदासाठी नाही, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्पष्ट केले आहे.
आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे याचे आम्हाला समाधान आहे. असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज नसल्याचे म्हटले. जत विधानसभा मतदारसंघातुन भाजपकडून आमदार झालेल्या आणि आटपाडी तालुक्यातील सुपूत्र असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडीत भव्य मिरवणूक आणि सत्कार सन्मान सोहळा पार पडला. यावेळी सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
आपला मंत्र्यापेशा रुबाब कमी नाही- गोपीचंद पडळकर
मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणुन कार्यकर्त्यांनी बारीक तोंड करू नका, आता आपल्या वाटयाचा संघर्ष संपलाय, आपला माणूस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालाय असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेत. आपण मंत्री नाही पण आपला मंत्र्यापेशा रुबाब कमी नाही, मंत्र्यासारखाचा माझा रुबाब आहे. काहीजण मला मंत्रिपद भेटले नाही म्हणून खुश झाले. पण आता आपण बाळूमामा झालोय, शांत संयमी राहायचे असेही पडळकर म्हणाले. मी मागच्या दाराने विधानपरिषदेत गेलोय असे विरोधक टीका करत होते. आता पुढच्या दाराला लाथ मारून जतच्या जनतेने मला विधानसभेत पाठवलेय, असेही पडळकरांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी श्रीकृष्णसारखे आहेत. संपूर्ण टेंभू योजनेला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नाव द्या अशी मागणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पडखळकरांनी संयम ठेवला पाहिजे-
भाजपकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या गोपीचंद पडखळकरांचा अंतिम यादीत समावेश नव्हता. त्यामुळे शरद पवार आणि मविआच्या नेत्यांवर तुटून पडणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने मंत्रिपद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. गोपीचंद पडळकर हे आताच विधानसभेत निवडून आले, यापूर्वी ते विधानपरिषदेत होते. गोपीचंद पडळकर हे उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते थोडे आक्रमक आहेत. हो निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं आहे की, बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे. पण गोपीचंद पडळकर हे एक चांगलं भविष्य असणारा तो नेता आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.