मुंबई : राज्यातील मंत्र्‍यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्रालयातील कार्यालयांचे म्हणजेच मंत्रालयीन दालनाचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर, मंत्र्‍यांना मुंबईत हक्काच घर, बंगल्यांचंही वाटप झालं असून आता सर्वच मंत्री महोदय कामाला लागले आहेत. त्यानुसार, आपल्या मंत्रालयीन दालनात जाऊन पदभार स्वीकारत आहेत, तसेच बैठका घेऊन अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. दरम्यान, भाजपने (BJP) कॅबनेटपदाची संधी दिलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा मंत्रालयीन (Minister) दालनातील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण, मंत्रालयातील दालनात त्यांनी चक्क पूजा घालून आपल्या कामकाजाची सुरुवात केली आहे. त्यामुळे, काही जणांकडून त्यांच्यावर टीका केली जात असून काहींनी त्यांच्या या श्रद्धेचं स्वागतही केलं आहे.  महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात संजय सावकारे यांचा समावेश झाला असून त्यांना वस्त्रोद्याग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 


राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग खाते मिळाल्याच्या नंतर त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या दालनात पूजा-अर्चा करत, आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. आपल्या खात्याच्या माध्यमातून राज्याच्या विकासात आणि रोजगार वाढीत भर पाडण्यास आपला प्राधान्यक्रम असणार आहे, असे संजय सावकारे यांनी म्हटलं. दालनात कर्मचाऱ्यांसमवेत ते पूजा-अर्चा करताना दिसून येत आहेत. मोठ्या जबाबादारीची किंवा कार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजा करुन, देवाचे नामस्मरण करुन पूजा घातली जाते. मंत्री संजय सावकारे यांनीही मंत्रालयीन कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी पूजा घालून आपली श्रद्धा व्यक्त केलीय. 


संजय सावकारे राष्ट्रवादीतूनही होते मंत्री 


संजय सावकारे यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी भुसावळ (जि. जळगाव) येथे झाला. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केला आहे.  यापूर्वी देखील त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते एकवेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तर तीनवेळा भाजपमधून आमदार झाले आहेत. या आधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषवले आहे. संजय सावकारे यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बाजी मारत ते पहिल्यांदा आमदार झाले. 2014 साली संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपाचे संजय सावकारे हेच विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना एकूण 87818 मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपाचे संजय सावकारे विजयी झाले होते. त्यांना एकूण 81689 मते मिळत त्यांच्या मतांची टक्केवारी 54.22 इतकी होती. तर 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांनी 46,955 मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांना एकूण 1 लाख 6 हजार 96 मते मिळाली. आता पर्यंत संजय सावकारे यांनी चार वेळेस आमदारकी भूषवली आहे. तर आता त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुसावळात एकच जल्लोष केलाय. 


हेही वाचा


बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल