यवतमाळ : कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यवतामाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. 


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. 


या आधीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. खासकरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना पडळकरांनी टोकाचे शब्द वापरल्याचं दिसतंय. आताही त्याच प्रकारचं वक्तव्य केल्याने त्यावरून राजकीय वाद होतो का हे पाहावं लागेल. 


भावना गवळी प्रचाराच्या मैदानात


यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी आग्रही होत्या. मात्र हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर भावना गवळी काहीशा नाराज होत्या. पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आपली भूमिका मांडली. आपण नाराज नाही, मात्र तिकीट न मिळाल्याची खंत आहे असं भावना गवळी म्हणाल्या. तर मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


राजश्री पाटलांच्या रणनीतीसाठी बैठकांचा सिलसिला


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत निवडूण आणण्यासाठी महायुतीने कंबर कसल्याचं दिसतंय. भावना गवळी आणि हेमंत पाटील या दोन सिटिंग खासदारांचं तिकीट कापल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय.


शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भावना गवळी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. राजश्री पाटील यांना निवडून आणणं महत्त्वाचं असल्याचं सांगत ते म्हणाले होते की, हेमंत पाटील आणि भावना गवळी देखील शिवसेनेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांचा मानसन्मान हा अबाधित ठेवला जाईल. 


भाजपच्या विरोधानंतर शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी यांचं तिकीट कापून ते हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना दिलं. त्यानंतर भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भावना गवळी यांचं विधानसभेच्या वेळी पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा आहेत. 


ही बातमी वाचा: